Parner Politics News : पारनेर विधानसभा मतदारसंघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील एक चर्चेतला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचा भिडू आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचा भिडू आमने-सामने आहेत.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये या ठिकाणी प्रमुख लढत होणार आहे. मात्र अपक्ष उमेदवारांची संख्या या मतदारसंघात फारच अधिक असल्याने निवडणुकीत अधिक रंगत येणार असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
यामुळे या मतदारसंघात उभे राहिलेले अपक्ष उमेदवार नेमका कोणाचा खेळ बिघडवणार, महायुतीच्या उमेदवाराला अपक्षांचा फायदा होणार की महाविकास आघाडीच्या ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 21 लोकांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. तसेच, अर्ज पात्र ठरणाऱ्या 20 उमेदवारांपैकी आठ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली.
म्हणजे निवडणुकीत सध्या 12 उमेदवार आहेत. त्यामुळे आता येत्या 20 तारखेला म्हणजेच मतदानाच्या दिवशी मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
मतदार संघात महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महायुतीकडून अजित पवार गटाचे काशिनाथ दाते हे उभे राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत राणी लंके आणि काशिनाथ दाते यांच्यातच खरी लढत होणार आहे.
पण, अपक्ष म्हणून माजी आमदार विजय भास्कर औटी व माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, तसेच शिवसेनेचे संदेश कार्ले हे निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. म्हणून निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असे दिसत आहे. या अपक्ष उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटात अस्वस्थता पसरलेली आहे.
मात्र माजी आमदार विजय भास्कर औटी व माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, तसेच शिवसेनेचे संदेश कार्ले हे कोणाचे मत खाणार? या अपक्ष उमेदवारीचा नेमका कोणाला फटका बसणार याबाबत आत्ताच भविष्यवाणी करणे थोडे कठीण आहे.
तथापि जाणकार लोकांनी नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी खा. नीलेश लंके यांच्या सोबत असलेले कार्ले आता लंके यांच्या विरोधात आहेत, तसेच ते अहिल्यानगर तालुक्यातील आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघात अहिल्यानगरचे दोन जिल्हा परिषद गट आहेत.
त्यामुळे हे मतदार स्थानिक उमेदवार या नात्याने कार्ले यांच्याकडे काही अंशी झुकल्याशिवाय राहणार नाहीत. आता या साऱ्यांचा फटका महायुतीच्या उमेदवारापेक्षा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अर्थातच लंके यांनाच बसणार असे म्हटले आहे.
याशिवाय यंदा दोन विजय औटी देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार? तर या दोन्ही अपक्ष उमेदवारांचा फटका लंके यांच्यापेक्षा दाते यांना अधिक बसू शकतो अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
याचे कारण असे की, लोकसभेच्या वेळी लंके यांच्या विरोधात दाते व विजय सदाशिव औटी या दोघांनीही काम केले होते, तसेच माजी आमदार औटी हेही लंके यांच्या सोबत नव्हते. त्यामुळे या दोघांच्या अपक्ष उमेदवारीचा फटका हा लंके यांच्यापेक्षा दाते यांनाच अधिक बसणार अशा चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहेत.
यामुळे अपक्ष उमेदवारीचा फटका नेमका महाविकास आघाडीला बसणार की महायुतीला हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दुसरीकडे मतदारसंघात सुशिक्षित मतदारांची संख्या देखील फारच अधिक आहे. सुशिक्षित मतदार कधीच आपले मत उघड करत नाहीत. यामुळे ऐनवेळी सुशिक्षित मतदार देखील यंदाची निवडणूक फिरवतील असे बोलले जात आहे.
याशिवाय यंदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांचे मत देखील मोठे निर्णायक ठरणार अशी शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला असता पारनेरचा पुढचा आमदार कोण असेल आणि या अपक्ष उमेदवारांचा फटका नेमका कोणाला बसणार या साऱ्या गोष्टी 23 तारखेला म्हणजेच मतमोजणीच्या दिवशीचं क्लिअर होतील असेच म्हणावे लागणार आहे.