पारनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीने खरंच उमेदवार बदलला ; अजित पवार गटाचा उमेदवार काशिनाथ दाते की औटी ? समोर आली मोठी अपडेट

Tejas B Shelar
Published:
Parner Vidhansabha

Parner Vidhansabha : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक उलटल्यानंतर आता महाराष्ट्रातील प्रमुख मतदारसंघातील लढती कशा असतील हे क्लिअर झाले आहे. पारनेर मध्ये देखील हे चित्र स्पष्ट झाले आहे.

अहिल्या नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघ हा एक हाय प्रोफाइल विधानसभा मतदारसंघ ठरत आहे. कारण की या जागेवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

महाविकास आघाडी कडून निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके यांना उमेदवारी बहाल करण्यात आली असून महायुतीकडून ही जागा अजित पवार गटाला सोडण्यात आली आहे आणि येथून अजित पवार गटाने काशिनाथ दाते यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे.

मात्र काल दुपारपासून पारनेर मध्ये एक बातमी व्हायरल होत आहे. या बातमीमध्ये महायुतीने आपला उमेदवार बदलला असल्याचे म्हटले गेले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता संभ्रमा अवस्थेत असून खरंच महायुतीने उमेदवार बदलला आहे का अशी विचारणा होऊ लागली आहे.

दरम्यान आता याच संदर्भात महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते यांनी मोठी माहिती दिली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की काल दुपारपासून पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या ऐवजी विजय सदाशिव औटी यांची उमेदवारी जाहीर केली जाणार अशा आशयाची बातमी वेगाने व्हायरल होत आहे.

यामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या बातमी मागे नेमके सत्य काय आहे? याबाबत अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते यांनी माहिती दिली आहे. काशिनाथ दाते यांनी महायुतीची उमेदवारी ही आपल्याकडेच असून जाणून-बुजून विरोधकांच्या माध्यमातून अशा बातम्या पेरल्या जात असल्याचे म्हटले आहे.

दाते यांनी सांगितल्याप्रमाणे, मतदारसंघातील महायुतीच्या सर्व अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व इतर पक्षातील सहकारी मित्रांना सुचित करण्यात येते कि,

महायुतीच्या अधिकृत उमेदवाराची प्रचारात दिसून येत असलेली आघाडी, जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता या मतदारसंघात परिवर्तन हे अटळ असल्याची विरोधकांची खात्री झाली असून, त्यातून येत असणाऱ्या नैराश्यातून महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे.

चुकीच्या पद्धतीने एडिटिंग करून दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. पण, आपण उमेदवारी नामनिर्देशन पत्रासोबतच पक्षाचा ए.बी. फॉर्म जमा केलेला आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट या राष्ट्रीय पक्षाचे आपणच अधिकृत उमेदवार आहोत. याबाबत कोणीही मनामध्ये शंका आणू नये, अशी माहिती दाते यांनी दिली असून अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe