Parner Vidhansabha : पारनेरच्या जागेवर महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाने उमेदवार दिला आहे. शरद पवार गटाने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके यांना येथून उमेदवारी दिलेली आहे. राणी लंके यांनी येथून उमेदवारी अर्ज देखील भरला आहे.
दुसरीकडे, ही जागा शरद पवार गटाला गेल्यानंतर ठाकरे गटातील काही नेते नाराज असल्याचे पाहायला मिळाले आहे. खरे तर ही जागा ठाकरे गटाला सुटावी अशी मागणी येथील शिवसैनिकांकडून लावून धरण्यात आली होती.
पण ऐनवेळी ही जागा शरद पवार गटाला सुटली आणि येथून निलेश लंके यांच्या धर्मपत्नींना उमेदवारी मिळाली. यामुळे नाराज झालेले उबाठा शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असल्याचे स्पष्ट झालय. दरम्यान या निमित्ताने खरंच पारनेर ची जागा ठाकरे गटाला देण्याचा काही निर्णय झालेला होता का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
आता याच संदर्भात नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी माहिती दिली आहे. खासदार लंके यांनी सांगितल्याप्रमाणे, श्रीगोंदा विधानसभेची जागा राष्ट्रवादीला द्यावी व पारनेर-नगर विधानसभा जागा उद्धवसेनेला द्यावी, असा आग्रह महाविकास आघाडीच्या श्रेष्ठींकडे धरला होता.
पण ठाकरे गटाचे नेते श्रीगोंदा येथील जागेवर ठाम राहिल्याने पारनेरची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळाली आहे. तसेच आपण विधानसभेला जागा देऊ असा कोणताही शब्द ठाकरे गटाला दिलेला नव्हता अशी माहिती खासदार लंके यांनी यावेळी दिली आहे.
दरम्यान, ठाकरे गटातील कार्ले आणि पठारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मतदारसंघातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी महाविकास आघाडीला पाठिंबा देणार की अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
पण, उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतलाय. तशी भूमिका सुद्धा निष्ठावान उद्धवसेनेच्या शिवसैनिकांनी गुरुवारी पारनेर येथे पत्रकार परिषद जाहीर केली आहे.
तसेच, पारनेर तालुक्यातील सर्व निष्ठावान शिवसैनिक विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत, अशी घोषणा डॉ. भास्कर शिरोळे यांनी यावेळी केली आहे.
तथापि ठाकरे गटाचे कार्ले आणि पठारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला असल्याने पारनेर ची निवडणूक ही बहुरंगी होणार आहे. यामुळे पारनेरचा गड कोण जिंकणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.