अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप ! भाजप नेत्याचा पक्षास रामराम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे नेवासा तालुक्यात सोनई भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व कायम निमंत्रित सदस्य दत्तत्रय काळे यांनी भाजपच्या सर्व पदाचा त्याग करत भेंडा बुद्रुक येथे आमदार शंकरराव गडाख गटात जाहीर प्रवेश केला.

नेवासे तालुक्यात भाजपची तोफ समजणाऱ्या काळे यांनी गडाख गटात प्रवेश केल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना धक्का बसला आहे.

काळे यांच्यासह भेंडा बुद्रुकचे उपसरपंच पंढरीनाथ फुलारी, देवगावचे सरपंच विष्णू गायकवाड, देवगावचे ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काळे, रवींद्र गायकवाड यांनी गडाख गटात प्रवेश केला.

राज्यात तसेच देशात अनेक पुढारी भाजपमध्ये जात असताना नेवासे तालुक्यात मात्र अनेकांनी भाजप सोडली आहे. खुपटी, शिंगवे तुकाई, नेवासे बुद्रुक, भानासहिवरे, शनिशिंगणापूर, कुकाणेसह अनेक भाजपचे निष्ठावंत गडाख गटात सहभागी झाले आहेत.

एकाच वेळी भेंडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य, देवगावचे सरपंच व रांजणगावदेवीचे सरपंच, भेंडा बुद्रुकचे उपसरपंच यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने तालुक्यात भाजपला खिंडार पडले आहे.

जि. प. सदस्य काळे यांचा भेंडा, कुकाणे, चांदा गटात मोठा लोकसंपर्क आहे. माजी आमदार मुरकुटे यांच्या गटातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काळे यांनी मोठी भूमिका बजावली होती.