Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा अर्थात दक्षिणेत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मताधिक्याने निवडून येण्यासाठी जंग पछाडले आहे. त्यांना यामध्ये महायुतीमधील अनेक घटकांची साथ मिळत आहे.
परंतु सध्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे विखे यांना दक्षिणेत मिळालेली जावई सासऱ्यांची साथ. अर्थात शिवाजीराव कर्डीले व आ. संग्राम जगताप यांची साथ. याची चुणूक काल (22 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करताना आयोजित रॅलीत दिसून आली.
या रॅलीमध्ये जिल्ह्यातून भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले असले तरी या रॅलीत ताकद दिसली ती म्हणजे आमदार संग्राम जगताप व माजी महापौर संदीप कोतकर व माजी आ. शिवाजी कर्डीले समर्थकांची.
छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर रॅलीस प्रारंभ झाला. उघड्या वाहनात बसून डॉ. विखे पाटील व आमदार संग्राम जगताप रॅली मार्गावरील लोकांना अभिवादन करीत होते. नंतर ते पायी चालू लागल्यावर कार्यकर्त्यांनी विखे पाटील व जगताप यांना खांद्यावर घेतले.
माळीवाडा, माणिक चौक, कापडबाजार, चितळे रस्ता मार्गे रॅली चौपाटी कारंजा परिसरात दाखल झाली. तेथे दुपारी दोन वाजता सभेत रूपांतर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनोगते व्यक्त झाली.
सासरे-जावयांचा करिष्मा
महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करीत शक्तिप्रदर्शन केले. त्या रॅलीत ताकद दिसली ती सासरे, जावयांचीच. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची प्रतिमा असलेले बॅनर कार्यकतें झळकावित होते.
काही कार्यकर्त्यांच्या हाती आमदार संग्राम जगताप यांची प्रतिमा होती. त्या जोडीला माजी महापौर संदीप कोतकर यांचीही प्रतिमा उंचावली जात होती. उभयतांचेच सर्वाधिक कार्यकर्ते दिसत होते. एकंदरीत वातावरण सासरे, जावयांचेच असल्याचे चित्र होते.
नगर शहर व केडगाव, भिंगार उपनगर तसेच नगर तालुकायत जर राजकीय ताकद पाहिलीत तर जगताप-कर्डीले-कोतकरांची राजकीय ताकद जास्त असल्याचे दिसते असे म्हटले जाते. त्यामुळे जर या तिघांचीही साथ डॉ. सुजय विखे यांना शेवटपर्यंत मिळाली तर खा. सुजय विखे यांना विरोधकांपेक्षा जास्त लीड मिळू शकते असे कार्यकर्ते सांगतात.