आरोप करणारे कोरोना काळात कुठे होते ? खासदार नीलेश लंके यांचा सवाल; माजी खा. सुजय विखे यांच्यावर घणाघाती टीका

Published on -
Parner News : एकाच घरात दोन उमेदवारीचा आरोप करणारे कोरोना काळात कुठे होते ? असा सवाल करीत आपली लढत ज्या पक्षाच्या उमेदवाराशी आहे, त्या पक्षाने नादी लावण्यासाठी एकाला उमेदवारी दिली आहे. त्या उमेदवाराला गावे सापडेपर्यंत निवडणूक संपणार आहे. आजपर्यंत अनेक गावात उमेदवार पोहचलेही नाहीत. आम्ही प्रत्येक गावात तिनदा पोहचलो आहोत. निवडणूकीपुरते भुछत्राप्रमाणे उगवणारे, ऐनवेळी मतदारांसमोर जाणारे मतदार कधीही स्विकारत नसल्याचा घणाघात खा. लंके यांनी केला.
महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारार्थ सुपा जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा नारळ वाळवणे येथील श्री काळभैरवनाथांना अर्पण करण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेत खा. लंके हे बोलत होते.
कोरोना काळात नीलेश लंके प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह आमचे कुटुंब दिवसरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी झटत होते.महामारीशी झुंजत होते.त्याकाळातील आणि इतर वेळेचे काम पाहून जनतेने मागणी केल्यामुळे उमेदवारी घ्यावी लागली.ही लादलेली उमेदवारी नाही हे मतमोजणीतून स्पष्ट होईल असे खासदार लंके म्हणाले.
खा. लंके पुढे म्हणाले,महाविकास आघाडीने पंचसुत्री प्रसिध्द केली आहे. महिलांना तीन हजार रूपये, शेतकऱ्यांचे तीन लाख रूपयांपर्यंतो कर्ज माफ. नियमित कर्ज भरणाच्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर मदत, सर्वांना २५ लाख रूपयांचे आरोग्य सुरक्षा कवच, बेरोजगारांसाठी चार हजार रूपये हा महाविकास आघाडीचा अजेंडा असल्याचे खा. लंके म्हणाले.
यावेळी माधवराव लामखडे,प्रसिध्द व्याख्याते यशवंत गोसावी, वसंत ठोकळ,बाबाजी तरटे, युवराज गाडे, कारभारी पोटघन, सचिन पठारे, सुवर्णा धाडगे, प्रियंका खिलारी, सुरेखा पवार, पुनम मुंगसे, बापू शिर्के, सतिश भालेकर, सचिनशेठ पवार, राजेंद्र चौधरी, राजेश्वरी कोठावळे, भाऊसाहेब भोगाडे, जयसिंग मापारी, दत्ता दिवटे, कल्पना थोरात, सुनिता झावरे, अनिता भोगाडे, विजेता साबळे, माया साळवे, सुनिता चौगुले, जयश्री  पठारे, राणी यादव, मनिषा जाधव यांच्यासह सुपा जिल्हा परिषद गटातील विविध गावांचे सरपंच, चेअरमन,महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
विधानसभा निवडणूकीमध्ये काही अपक्ष उमेदवारांनी प्रवरेचे टेंडर भरले आहे. लोकसभा निवडणूकीत आपण पराभूत केले म्हणून लोणीवाल्यांनी आता ही पॅकेजवर गंमत सुरू केली आहे. म्हणतात ना, सुंभ जळाला तरी पिळ जळत नाही अशी लोणीकरांची अवस्था झाली आहे. प्रमुख पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक सोडली असल्याने आपल्याकडे विजयाची गॅरंटी आहे. त्यामुळेे इकडे-तिकडे जाणारांनी आमच्याकडे यावे अशी साद खा. लंके यांनी घातली.
यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, प्रत्येक गावात जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करा. घराघरात जाऊन प्रचार केला तर चांगले यश मिळाले. लोकसभा निवडणूक ही सराव परीक्षा होती, आता वार्षिक परीक्षा म्हणून विधानसभा निवडणूकीकडे पाहा. या निवडणूकीत सुपा गटात सर्वाधिक मताधिक्य मिळाले पाहिजे. कारण या गटापासून आपण आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली आहे. गटामध्ये १४ ते १५ हजारांचे मताधिक्य  मिळाले पाहिजे. लोकसभा निवडणूकीत १५ हजारांचे मताधिक्य निघोज गटाने दिले. तुम्हाला कमीपणा वाटत नाही का ? असा सवाल लंके यांनी केला.
राणी लंके १ लाखांनी विजयी होणार 
खरा शिवसैनिक असेल त्याने उध्दव ठाकरे यांना ज्या पध्दतीने बाहेर काढण्यात आले, ज्या शरद पवारांना या वयात दुख दिले, त्याचा बदला घेण्याची आता वेळ आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. आपल्या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार किमान एक लाख मतांनी विजयी होणार असल्याची ग्वाही खा. लंके यांनी यावेळी दिली.
बैलाकडे पाहून सौदा करणार की मालकाकडे ?
पारनेर येथे सभेसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्याने कांद्याच्या प्रश्न विचारल्यावर तुला नीलेश लंकेने पाठविले काय ? अशी विचारणा अजित पवार यांनी केली होती. उमेदवार कोण आहे  हे पाहू नका. माझ्याकडे पाहून मतदार करा असे आवाहन पवारांनी केले होते. शेतकरी बैल घेताना बैलाकडे पाहून घेणार की बैल विकणाराकडून ? असे सांगत गोसावी यांनी पवारांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली.
राणी लंके यांची खंत
या गटाने, गणाने व गटाने मला पंचायत समिती, जिल्हा परीषदेच्या निवडणूकीत विजयी केले आहे. ही माझी कर्मभुमी आहे. विकास कामांसाठी खासदारांनी मोठा निधी दिला. तरीही लोकसभा निवडणूकीत कमी झालेल्या मतदानाबद्दल उमेदवार राणी लंके यांनी खंत व्यक्त केली.  विकास कामात आम्ही कुठे कमी पडलो ? कोणाच्या सुख, दुःखात आम्ही सहभागी झालो नाही ? असे प्रश्न उपस्थित करत लंके यांनी मागिल निवडणूकीत झालेली चुक सुधारण्याचे आवाहन केले.
हक्काने लिड द्या, हक्काने कामे मागा  
खासदारांनी मतदारसंघासाठी २ हजार कोटी रूपयांचा निधी दिलेला आहे. लोकसभा निवडणूकीत झालेली चुक सुधारून कोठेही गाफील न राहता प्रचारात सहभागी झाले पाहिजे. महिला आमदार होणार म्हणून महिलांनी प्रचारात सहभागी झाले पाहिजे. पुढील सहा दिवस प्रचाराचे आहेत. तुम्ही प्रचार करा. पुढील पाच वर्षे आम्ही दोघे तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध असू. हक्काने लिड द्या व हक्काने विकास कामे मागा.
राणी लंके
महाविकास आघाडीच्या उमेदवार
नगर तालुक्यातून ६० हजार मतदान
२५ ,३० वर्षापासून मी पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारण करत आहे. त्यामुळे नगर तालुक्यातून कसे मताधिक्य मिळावायचे हे अम्हाला माहीती आहे. राणी लंके यांना नगर तालुक्यातून ६० हजार मते मिळतील. नगर तालुक्यातील उमेदवाराच्या जि प गटातील फक्त चार गावे या मतदारसंघात आहेत. पारनेर तालुक्यातून तुम्ही जास्त मताधिक्य द्या, उर्वरीत उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली पाहिजे असे काम करा.
माधवराव लामखडे, माजी जिल्हा परिषद सदस्य.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!