Radhakrishan Vikhe Patil News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात देखील दोन्ही गटांकडून प्रचार केला जात असून महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत.
शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील प्रचारात व्यस्त आहेत. शिर्डीमध्ये तर त्यांच्या माध्यमातून प्रचार सुरूच आहे, शिवाय जिल्ह्यातील इतरही मतदारसंघांमध्ये ते महायुतीच्या उमेदवारांसाठी मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत.
दरम्यान काल राधाकृष्ण विखे पाटील हे एकरुखे व रांजणगाव खुर्द येथे गेले होते. येथे ग्रामस्थ आणि पदाधिकार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
या दोन्ही गावांत मोटारसायकल रॅली काढून विखे पाटील यांचे स्वागत करण्यात आले, या रॅलीमध्ये महिला आणि युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा उपस्थित केला अन यावरून विरोधकांना घेरले.
गणेश कारखाना बंद होता, त्यावेळी तो चालविण्यासाठी विरोधक का पुढे आले नाहीत? गणेश कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा, या हेतूने आपण तो चालवायला घेतला होता. आम्ही पुढाकार घेतला नसता, तर त्याचा लिलाव झाला असता.
सभासद वाढविले असते, तर तो आमच्याच ताब्यात राहिला असता, हे विसरू नका असं म्हणतं गणेश कारखान्यावरून विखे परिवारावर आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे. तसेच, विरोधक व्यक्तिगत टीका टिप्पणी करता.
मात्र, विकासाच्या मुद्यावर का गप्प राहतात? असाही सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणालेत की, शेजारचे नेते आपल्या भागात येऊन संभ्रम निर्माण करतात. मंत्री असताना त्यांनी आपल्या भागासाठी दमडीचाही निधी दिला नाही.
पालकमंत्री या नात्याने संगमनेर तालुक्यासाठी आपण राजकारण आड येऊ न देता निधी दिला. भावनिक मुद्दे उपस्थित करून हे नेते स्वत:च्या चुका झाकतात. ते पाटबंधारे मंत्री असताना समन्यायी पाणीवाटप कायदा मंजूर झाला. जिल्ह्याचे हक्काचे पाणी गेले. त्यावर ते बोलत नाहीत. दहशतीचा मुद्दा घेऊन ते संभ्रमीत करू पहात आहेत.
मात्र, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. महायुती सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांचा लाभ शिर्डी मतदारसंघातील प्रत्येकाला झाला आहे. एक रुपयात पीकविमा योजनेपासून ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. वीजबिल माफीचा मोठा निर्णय झालाय.
लाडकी बहीण योजनेला न्यायालयात जाऊन विरोध आणि पंचसूत्री कार्यक्रमात या योजनेत वाढीव पैसे देण्याचे आश्वासन देतात. पण, लोक त्यांच्या बनवाबनवीला फसणार नाहीत, असं म्हणतं राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.