Radhakrushan Vikhe Patil News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सबंध महाराष्ट्रात प्रचार सभांचा झंझावात सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून आपापल्या उमेदवारांसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अहिल्या नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी कंबर कसली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नांदूर, रांजणखोल आणि ममदापूर या ठिकाणी महायुतीची प्रचारसभा घेतली. त्यांनी या आयोजित सभेमध्ये मतदारांशी संवाद साधून महायुतीने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे. विखे पाटील यांनी, राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलपणे निर्णय घेतले आहेत.
नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने विविध योजनांमधून बारा हजार कोटी रुपयांची मदत केलीये अशी माहिती यावेळी उपस्थितांना दिली. एवढेच नाही तर येणाऱ्या काळात महायुती सरकार पुन्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.
तसेच त्यांनी महाविकास आघाडी अन त्यांच्या धोरणावरही टीका केली. ते म्हणालेत की, यापूर्वी सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारने महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले होते. आता महायुतीने योजना सुरू केल्यानंतर आघाडीच्या नेत्यांना जाग आली आहे.
पण त्यांच्या योजनांची आश्वासने ही खोटी असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केलाय. आघाडीने राज्यासमोर पंचसूत्री ठेवली आहे; पण आघाडीच्या नेत्यांमध्ये सुसूत्रता नाही. त्यामुळे त्यांच्या पंचसूत्रीवर जनतेचा विश्वास नाही.
ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे तिथे अशा योजना सुरू करून त्या योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणी महाविकास आघाडीच्या कोणत्याही योजनेवर विश्वास ठेवणार नाहीत. आम्ही योजना सुरू करून, चार हप्ते खात्यात वर्ग केल्यामुळे महायुतीच्या योजनेची खात्री बहिणींना आली आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्व बहिणी महायुतीमधील भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील, असं म्हणतं राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला. एकंदरीत महायुतीचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात आले तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होईल असे आश्वासन यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे.