२१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी दाखल मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे.न्यायालयाने या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने याप्रकरणी झारखंड सरकार व मानहानीचे प्रकरण दाखल करणारे भाजप नेते नवीन झा यांना नोटीस जारी करत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.तसेच पुढच्या आदेशापर्यंत कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती दिली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झारखंडच्या चाईबासामध्ये राहुल गांधी यांनी एक भाषण केले होते.यामध्ये त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांचा उल्लेख ‘खुनी’ असा केला होता. खंडपीठासमोरील सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी राहुल गांधी यांची बाजू मांडली.
न्यायालयाचे अनेक निर्णय असे आहेत की,ज्यामध्ये फक्त पीडित व्यक्तीच मानहानीची तक्रार दाखल करू शकतो,असा निर्वाळा दिलेला आहे.मानहानीची तक्रार तिसऱ्या पक्षाकडून दाखल केली जाऊ शकत नाही,असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला.
राहुल गांधी यांनी झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे.कनिष्ठ न्यायालयात याप्रकरणी सुरू असलेली कारवाई रद्द करण्यासाठी राहुल गांधींनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.