Rahuri Politics : राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झाली आहे. तनपुरे विजय निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून मतदारांमध्ये जात आहेत. विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारासाठी आज राहुरी येथे विजय निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या विजय निर्धार मेळाव्यात प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आणि त्यांनी केलेल्या पाच वर्षांच्या कामांची यादी सर्वसामान्य मतदारांसमोर मांडली.
आ. प्राजक्त तनपुरे यांचे Uncut भाषण ?
प्राजक्त तनपुरे यांनी, ‘2019 मध्ये मायबाप जनतेने मला निवडून दिले आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी सत्तर वर्षानंतर राहुरी तालुक्याला मंत्री पदाची संधी दिली. मला ऊर्जा राज्यमंत्री केले म्हणून शरद पवार साहेबांचे मनापासून आभार. आपलं सरकार येण्याच्या अगोदर या भागातील, राज्यातील शेतकऱ्याला वीज कनेक्शन घेण्यासाठी सुद्धा दोन वर्षे लागायची. साधी डीपी बसवण्यासाठी सुद्धा महावितरण कडे योजना नव्हती.
राज्याच्या विजेच्या सर्व पायाभूत सुविधा कोलमडल्या होत्या. पण, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने कृषी धोरण 2020 आणलं. राज्यातील शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठा निधी देण्यात आला. संपूर्ण राज्यात विजेच्या क्षेत्रात काम झालं. राहुरी मतदारसंघात सहा नवीन सब-स्टेशन बसवले. 4-5 सब स्टेशनची क्षमता वाढवली. कित्येक ठिकाणी फिडर ओव्हरलोड होते. यामुळे लिंक लाईन टाकल्या आणि जवळपास तीनशे चारशे नवीन शेतकऱ्यांच्या बांधावर डीप्या देण्याचे काम आपण केले.
काल-परवा समोरच्या उमेदवारांनी ऊर्जा मंत्र्याने काय बाबा डीप्या द्यायच्या असतात का? असं म्हटलं. मला पत्रकारांनी याबाबत विचारलं मग मी म्हटलं मग ऊर्जा मंत्र्यांनी काय गोट्या खेळायच्या असतात का? मित्रांनो साहेबांनी जी जबाबदारी दिली ती आपण पार पाडली. मात्र जो एसीएफ फंड होता ज्याच्या माध्यमातून आपण ही सगळी कामे करू शकलो, शेतकऱ्यांना नवीन सब स्टेशन, डिप्या देऊ शकलो, सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारू शकलो तो फंड भाजपा सरकारने गोठवला. जवळपास दोन हजार कोटी रुपये त्या फंडामध्ये असताना तो फंड गोठवला.
मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून याबाबत विधानसभेत विचारणा केली. मी मंत्री महोदयांना ही योजना बंद का केली असं विचारलं पण मंत्री महोदय काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. मंत्री महोदय म्हणालेत की तनपुरे जी तुम्ही जो फंड विचारताय त्याचा मी अभ्यास करतो आणि मग तुम्हाला सांगतो. ज्या योजनेमधून शेतकऱ्यांचे भलं करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं ती योजना जर भाजपाच्या मंत्र्यांना माहिती नसेल तर हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे दुर्दैव आहे. महाविकास आघाडीच्या काळात कित्येक योजना आपण शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता राबवल्या.
महाविकास आघाडीने शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचाच घेतला. त्यावेळी कोरोनामुळे राज्य सरकारचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले होते. अक्षरशः सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कर्ज घेऊन करावे लागणार की काय अशी परिस्थिती होती. पण असे असतानाही शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफी त्या ठिकाणी पूर्ण केली. रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान देऊन असं आपण म्हटलं होतं.
पण कोविड मुळे पैसे देता येत नाहीत, पैशांचे सोंग आणता येत नाही असे आमचे नेते जे की आज तिकडे आहेत ते म्हणायचे. मात्र आत्ताच हे नवीन सरकार अजूनही ते 50 हजार देऊ शकले नाही. पण मी एक सांगतो राहुरी विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने मला 2019 ला संधी दिली. आदरणीय साहेबांनी मला आशीर्वाद देऊन मंत्री केलं. अडीच वर्ष आपल सरकार असताना अहोरात्र विचार करून राज्यासाठी तर धोरणे बनवलीतच पण या मतदारसंघात सुद्धा विकासाची गंगा पोहोचवण्याचे काम आपण केलंय. समोरच्या लोकांकडे मुद्दा नाही.
पाट-पाण्याचा प्रश्न, वांबोरी चारीचा प्रश्न, निळवंडे धरणाचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, एकही प्रश्न असा नाही की जिथे आपण हात घातला आणि काम चांगलं करून दाखवलं नाही. मागच्या आमदाराने तीन निवडणुकांमध्ये निळवंडे चे फक्त आश्वासन दिले. पण मी पहिल्याच टर्ममध्ये प्रश्न मार्गी लावला. यासाठी 1250 कोटी रुपयांचा निधी आणला. वांबोरी चारी च्या पाण्यावर देखील मागच्या आमदाराने फक्त बटन दाबली. मुळा धरणावर जायचे बटन दाबायचे तिथे काय व्हायचं मी काही जास्त बोलत नाही. पण मागे पाईपलाईन फुटायची.
680 एमसीएफटी वांबोरी चारीचे पाणी हा माणूस दहा वर्षांमध्ये देऊ शकला नाही. हक्काचं पाणी सुद्धा देऊ शकला नाही. मात्र पाच वर्षांमध्ये आपण 680 एमसीएफटी पाणी व्यतिरिक्त जे ओवरफ्लोचे पाणी आहे ते देखील वांबोरी, कात्रट, गुंजाळे परिसर, नगर तालुक्यातील काही गाव आणि पाथर्डी मधील टेलच्या गावांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. समोरासमोर चर्चेला आणा, कदाचित मी खोटं बोलेल ते खोटे बोलतील पण आकडे काही खोटे बोलणार नाहीत. कधी-कधी तर आपण एक टीएमसी पाणी या वांबोरी चारीला देण्याचे काम केलंय.
मी कित्येक काम सांगू शकतो. सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना होती जी की आमच्या मागच्या सरकारने सुरू केली होती. पण मात्र हा गडी 10 वर्षे आमदार असताना एकही प्रकल्प या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आणू शकला नाही. या योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणारी होती मात्र या योजनेच्या माध्यमातून हा गडी एकही प्रकल्प मतदारसंघात आणू शकला नाही. फक्त इथं बडबड पण मुंबईत मात्र गडी कधी बोलला नाही. या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण मतदार संघात चार प्रोजेक्ट स्वतः मंजूर करून आणलेत.
याही पलीकडे सांगतो की भाजपाच्या काळात या योजनेमध्ये सबस्टेशनच्या बाजूला ज्या शासकीय जागा आहेत त्यावर सौर ऊर्जा प्रकल्प राबवायचा आणि त्या सब स्टेशनच्या आसपासच्या लोकांना दिवसा वीज द्यायची अशी ही योजना होती. मात्र आपण मी स्वतः ऊर्जा राज्यमंत्री असताना सचिवांशी बोलून त्याच्यात काही बदल केलेत. शासकीय जागा सगळीकडे नसतात म्हणून मग शेतकऱ्यांच्या खाजगी जागा देखील या योजनेत घेऊन त्यांना एकरी 50 हजार रुपये एवढे भाडे देण्याचा जीआर आपण काढला.
आता जसे वरवंडी, बाबुळगाव, धामोरे चे शेतकरी जसा दिवसा विजेचा लाभ घेत आहेत. याचप्रमाणे पुढील पाच वर्षांच्या काळात मतदारसंघातील कित्येक गावांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा विजेचा लाभ आपल्याला द्यायचा आहे. मी पाच वर्षात प्रत्येक मूलभूत प्रश्नाला हात घातलाय. समोरच्या उमेदवाराकडे माझ्यावर बोलण्यासाठी कोणताच मुद्दा राहिलेला नाही. समोरच्या उमेदवाराने दहा वर्षात केलेलं एखादं ठळक काम दाखवावं.
ते निळवंडे धरणाचं पाणी आणू शकले नाहीत, वांबोरी चारीच्या कामाला न्याय देऊ शकले नाहीत, मुळा धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याच्या पाण्याचे नियोजन करू शकले नाहीत, साधा राहुरीचा एसटी स्टँड सुद्धा करू शकले नाहीत, कोणताही मोठा प्रकल्प इथे आणू शकले नाहीत, दहा वर्षात फक्त याची जिरव, त्याची जिरव याच्या पलीकडे मागच्या आमदाराला काहीच करता आलं नाही. आता निवडणूक आली तर उड्या मारायला लागलेत. मित्रांनो निवडणूक आयोगाचा एक नियम आहे.
यानुसार प्रत्येक उमेदवाराला, माझ्यासह प्रत्येक उमेदवाराला आपल्यावर काय-काय गुन्हे आहेत याचा एक तपशील वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन सार्वजनिक करावा लागतो. म्हणजेच सर्वसामान्य मतदारांना मतदानासाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांवर कोणकोणते गुन्हे आहेत याची माहिती मिळू शकेल हा या मागचा उद्देश आहे. माझ्यावर देखील ईडीचा एक गुन्हा आहे. पण तो ईडीचा गुन्हा आमच्या विरोधी पक्षांच्या सर्वच आमदारांवर आहे. त्याच्यामध्ये काही नवीन नाही. मात्र समोरच्या उमेदवाराची जेव्हा पेपर मध्ये जाहिरात बघितली अक्षरशः अर्ध पान भरून जाहिरात होती. समोरच्या उमेदवारावर किती गुन्हे आहेत यासाठी अर्ध पान भरून जाहिरात द्यावी लागली.
पण समोरच्या उमेदवाराने एक गंमत केली ती म्हणजे ही जाहिरात त्यांनी इंग्रजी पेपरला दिली.’ असं म्हणत प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांच्यावरील गुन्ह्याबाबतची इंग्रजी वृत्तपत्राला दिलेली जाहिरात वाचली. तसेच, यावेळी तनपुरे यांनी उपस्थित मतदार बंधू-भगिनींना त्यांच्या पाच वर्षांच्या कामाची आणि समोरच्या उमेदवारांच्या कामांची तुलना करून मतदान करण्याचे आवाहन केले.