Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी महानगरपालिका निकडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मनसेचा 17 वा वर्धापन दिन ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुका जेव्हा लागतील, तेव्हा मनसे सत्तेत असणार, मी फक्त आशा दाखवत नाही. मला माहिती आहे. आपल्याला महानगरपालिका जिंकायच्या आहेत. असेही ते म्हणाले.
महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपण सत्तेत असणार म्हणजे असणार, असे म्हणत राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. बहुमत हाती यायला भाजपाला १९५२ ते २०१४ इतका वेळ वाट पाहावी लागली.
असे असले तरी मात्र, मनसेला एवढा वेळ लागणार नाही. मी बहुमत लवकर आणणार. त्यामुळे मनसे सत्तेपासून दूर नाही. सध्या जनता या सर्वांना विटलेली आहे. मी बोलत राहणारच. मी मतदारसंघापर्यंत भाषणासाठी येईल.
तुम्ही प्रत्येक घराघरांपर्यंत जा. आपण सत्तेपासून दूर राहणार नाहीत. लवकरच सत्तेत येण्यासाठी नव निर्माणाचे काम आपण करणार आहोत, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, भाजप आणि राज ठाकरे यांच्यात सध्या एकत्र येण्यावरून काहीही बोलणं झालं नसलं तरी हे पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.