विविध वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिलेल्या विधानपरिषद नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत बुधवारी (दि. २६) किरकोळ बाचाबाची, शाब्दिक चकमक, पैसे वाटल्याचा आरोप अशा वातावरणात सरासरी ९३.४८ टक्के इतके विक्रमी मतदान झाले.
शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे, ठाकरे गटाचे संदीप गुळवे व अपक्ष विवेक कोल्हे यांच्यासह २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक ९६.१२, धुळे जिल्ह्यात ९३.७७,
जळगावात ९५.२६ नाशिकमध्ये ९१.६३, तर अहमदनगरमध्ये ९३.८८ टक्के मतदान झाले. गतवेळच्या तुलनेत यावेळी मतदानात एक ते दीड टक्का वाढ झाली आहे. नाशिक विभागातील एकूण ९० केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यात नाशिक जिल्ह्यातील २९, अहमदनगर २०, जळगाव २०, धुळे १२ आणि नंदुरबार जिल्ह्यातील नऊ केंद्रांचा समावेश होता.
अनुदानित शाळांमधील शिक्षकांना मतदानासाठी सुटी, तर विनाअनुदानित तत्त्वावरील शाळांच्या शिक्षकांना मतदानासाठी दोन तासांची सवलत देण्यात आली होती. राजकीय पक्ष व उमेदवारांची आपल्या हक्काचे मतदान करवून घेण्यासाठी सर्वच मतदान केंद्रांवर धडपड दिसून आली.
राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत एकूण २१ उमेदवार असून, शिवसेनेचे शिंदे गटाचे किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे अॅड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, भाजपशी संबंधित अपक्ष विवेक कोल्हे या चौघांमध्ये मुख्य लढत झाली. शिक्षणसम्राट, साखर सम्राटांसारखे दिग्गज रिंगणात असल्याने निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
अनेक ठिकाणी मतदान केंद्राची अवस्था ‘मतदार जास्त अन् केंद्र कमी’ अशी असल्याने शिक्षक मतदारांच्या लांबच लांब रांगा अनेक ठिकाणी दिसून आल्या. तीन ते चार तास ताटकळत उभे राहावे लागल्यामुळे अधिक मतदान केंद्राची मागणी केली जात होती.
सर्वाधिक मतदार नाशिक जिल्ह्यातील नाशिक विभागात एकूण ६९ हजार ३६८ मतदारांची नोंदणी झाली आहे. यात सर्वाधिक २५ हजार ३०२ मतदार नाशिक जिल्ह्यातील आहेत.