Ahmednagar Politics : अहमदनगर शहरात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ताबेमारी, गुंड शाही आदी गोष्टींचा उल्लेख करत आ. संग्राम जगताप यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे नाव न घेता टीका केली.
आता याला राष्ट्रवादीकडूनही उत्तर देण्यात आले आहे. नगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेता सुभाष चौकातील लोढा हाईट्सवर तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी अनेक वर्षांपासून ताबा मारलेला आहे.
त्यामुळे शिवसेनेच्या नगरमधील नेत्यांनी मारलेला ताबा पहिले सोडावा असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना दिला आहे. तसेच, बहुचर्चित पत्राचाळ ताबामारी प्रकरणात जेलची हवा खाऊन आलेल्या राऊत यांनी आधी आपल्याखालचा अंधार झाकावा, अशी टीका राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी केली.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता गुंडगिरी व ताबेमारीची टीका केली. त्याला राष्ट्रवादीकडून तत्काळ प्रत्युत्तर देण्यात आले आहे. रिकामटेकडया कार्यकत्यांनी खोटे सांगून तुमचे कान भरले आणि त्यांचे ऐकून तुम्ही खातरजमा न करता टीका करत आहत. हे आम्ही खपवून घेणार नाही.
आमदारकीच्या दोन टर्ममध्ये अनेक लोकोपयोगी कामे झाली. नगर दक्षिणचे खासदार आणि आमदार खांद्याला खांदा लावून विकास कामात मोठा निधी खर्च करतात. ज्या खराब रस्त्यावरून तुम्ही गेलात त्या भागातील नगरसेवक तर तुमच्याच पक्षाचे आहे,
ही वस्तुस्थिती आहे. ज्या वार्डात तुमची बैठक होती त्या बुरूडगाव रोड सत्यावरील सिमेंटची चकाकी तुमच्या डोळ्यांना का दिसेनाशी झाली? या अगोदर महापालिकेत तुम्ही जो सत्तेचा उपभोग घेत होता, तो तर राष्ट्रवादीच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळाली होती. ही सत्ता मिळवण्यासाठी तुमच्या आधीच्या संपर्क प्रमुख, राज्य आणि राष्ट्रीय नेतृत्वाने किती वेळा आमच्या पक्ष कार्यालयाचे उंबरे झिजवले, हा इतिहास जनतेला माहिती आहे, असा टोलाही विधाते यांनी लगावला.
नगर शहराने नरक यातना भोगल्या त्यामुळे पुढच्या दोन टर्म नगरकरांनी तुम्हाला नाकारले राष्ट्रवादीने खा. राऊत यांना सुनावले आहे.