Maharashtra News : सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी ओबीसी विरुद्ध मराठा, असा संघर्ष महाराष्ट्रात उभा केला आहे. त्यांचे वर्तन घटनाविरोधी असल्याने
सरकारने त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी, अशा मागणी मराठा युवा संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अंबड येथील ओबीसींच्या सभेत ना. भुजबळ यांनी मराठा समाजावर गरळ ओकण्याचे काम केले आहे. भुजबळ यांच्यावर स्टॉम्प घोटाळा, रेशन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक संस्थांतील घोटाळ्यांचा आरोप असून,
त्यांनी ओबीसी समाजाची प्रतिमा मलीन केलेली आहे. भुजबळ हे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. भुजबळ यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली करून स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे.
भुजबळ यांनी मनोज जरांगेवर केलेली टीकाही शांततेचा भंग आहे, त्यामुळे त्यांनी केलेले वर्तन घटनाविरोधी असून, शासनाची प्रतिमा मलीन झाली आहे, त्यामुळे अशा मंत्र्याची त्वरित पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी डांभे यांनी केली आहे.