Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे होर्डिंग्ज मुंबईत झळकले होते. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे.
असे असताना काल खासदार सुप्रिया सुळे यांचा देखील पोस्टर लागल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असे नमूद करण्यात आलं आहे. नंतर काहीच वेळात हे पोस्टर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तत्काळ काढून टाकण्यात आले.
असे असताना आता मनसे प्रवक्ते यांनी राष्ट्रवादीला डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवल्यानंतर रसातळाला घेऊन गेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते स्वतःचा पक्ष संपवणार का, अशी शंका घ्यायला जागा असल्याचा निशाणा मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी राष्ट्रवादीवर साधला आहे.
तसेच आता महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री रोहित पवार, आता फक्त हेच बॅनर लागणं बाकी असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. यामुळे याचीच चर्चा आज सुरू होती. दरम्यान, या प्रकरणी लवकरच पक्ष कार्यालयाच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर लावलेल्या या बॅनरमागील सूत्रधाराचा शोध राष्ट्रवादी काँग्रेस घेत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील पोस्टर अशाच प्रकारे लावण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी एका कार्यक्रमात अजित पवारांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.
त्यानंतर जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स झळकल्यामुळे राष्ट्रवादीत सध्या मुख्यमंत्री पदासाठी दोन गट पडले असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले देखील होते, ते म्हणाले, सध्या आमच्याकडे त्यासाठीचे संख्याबळ नाही. असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले होते.