Ahmednagar Politics : जामखेड महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. राजकारणात मोठा दबदबा असलेल्या पवार कुटुंबातील उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नंतर कर्जत जामखेड मधुन पहिल्यांदाच निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून मतदार संघातील जामखेड शहरात बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. यापूर्वी असे बॅनर पुणे जिल्ह्यात झळकले होते.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता आ. रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
आ. रोहित पवार यांचा दि. २९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे जामखेड शहरात वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत.
आ. रोहित पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे. आ. रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री बॅनर पुणे जिल्ह्यातील मावळ येथील टोलनाक्यावर हे बॅनर लागले आहेत.
पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, सध्या पिंपरी-चिंचवड शहरात आ. रोहित पवारांनी लक्ष घातलं असून, दौरे करायला सुरुवात केली आहे.
आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मावळातील उसे टोलनाक्यावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावले आहेत. या बॅनरमध्ये त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.