Shalinitai Vikhe Patil News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात प्रचार सभांचा धुराळा उडत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून प्रचार सभांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला जात आहे. दोन्ही गटांकडून अर्थातच महायुती आणि महाविकास आघाडी कडून सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि आज महाविकास आघाडीने देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, आता महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील मोठे भाष्य करत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.
खरे तर सध्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रूक येथे कार्यकर्ते व महिलांशी शालिनीताई विखे यांनी संवाद साधला.
हा संवाद साधताना शालिनीताई यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावरून टीका केली. महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिल्यानंतर कोर्टात जाणार्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता बहिणींना तीन हजार रुपये देण्यासह अनेक सवलती देण्याची घोषणा केलीये.
परंतू महिलांसह शेतकरी, युवक व सामान्य जनतेला महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात कोणता आधार दिला? असा सवाल करत शालिनीताई यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी विरोधकांच्या माध्यमातून केवळ खोट्या घोषणा दिल्या जात आहेत अन जनतेला केवळ गाजर दाखवण्याचे काम होत असल्याची टीका देखील केली.
त्या म्हणाल्यात की, शिर्डी मतदार संघात जाती-पातीचे राजकारण न करता आम्ही समाज जोडण्याचे काम केलेय. सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे नवे पर्व मतदार संघामध्ये सुरू आहे. कुणी कितीही ताकत लावली तरी राधाकृष्ण विखे पाटील मोठ्या मताधिक्क्यांनी निवडून येतील. जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांचे संघटन केले.
महिलांचा वापर केवळ राजकारणासाठी न करता विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना रोजगार निर्मिती करुन दिली,’ असं म्हणतं शालिनीताई यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली आहे. पुढे बोलताना शालिनीताईंनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री विखे पाटील नेहमीच त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आजपर्यंत मंत्री विखे पाटील यांनी समाज जोडण्याचे काम केले आहे. कुटुंब प्रमुख म्हणून मतदार संघातील सर्व समाजाची जबाबदारी मंत्री विखे पाटील सक्षमपणे पार पाडीत आहेत, असेही प्रतिपादन शालिनीताई विखे पाटील यांनी केले.