Shantigiri Maharaj : २०२४ च्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत ‘लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा’ ही टॅग लाईन घेऊन श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
शांतीगिरी महाराज स्वतः नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून इतर अन्य सात ठिकाणी भक्त परिवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे, अशी माहिती शांतीगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संत एकनाथ रंगमंदिरात रविवारी सकाळी जिल्ह्यातील बाबाजींच्या भक्त परिवारच्या प्रमुख प्रचारकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शांतीगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
ते पुढे म्हणाले, आमची लढाई स्वतःसाठी नाही तर देशहितासाठी आहे. शुद्ध राजकारण करायचे असेल तर चांगल्या माणसाने राजकारणात येणे आवश्यक आहे. राजकारणी हा निःस्वार्थी असावा. दे
शहिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही निःस्वार्थपणे राजकारण करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी सेवागिरी महाराज, कैवल्यानंद महाराज, नागेश्वरानंद महाराज, विष्णूमहाराज, राजकीय समिती प्रमुख राजेंद्र पवार आदीची प्रमुख उपस्थिती होती.
लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी जिल्हाभरासह अन्य ठिकाणाहून आलेल्या तालुका सेवकांनी जनार्दन स्वामी यांच्या पालखीचे पूजन केले. त्यानंतर प्रमुख प्रचारकांनी शांतीगिरी महाराज यांच्या भव्य पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.
भक्त परिवारातील उमेदवार मैदानात उतरवणार
शांतीगिरी महाराज म्हणाले, ‘लढा राष्ट्रहिताचा : संकल्प शुद्ध राजकारणाचा’ या टॅग लाइनखाली आम्ही आठ लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढवणार आहोत. नाशिक मतदारसंघातून मी स्वतः लोकसभेची निवडणूक लढवणार आहे.
तर दिडोरी, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर शिर्डी आदी ठिकाणी भक्त परिवारातील उमेदवार मैदानात उतरवणार आहोत. नाशिक लोकसभेची निवडणूक लढवून मीच विजयी होणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.