शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ : अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या पूजा खेडकरांच्या वडिलांची संपत्ती किती ? वाचा…

Tejas B Shelar
Published:
Shevgaon Pathardi Vidhansabha Nivdnuk 2024

Shevgaon Pathardi Vidhansabha Nivdnuk 2024 : शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक विशेष काटेदार होणार आहे. ही निवडणूक बहुरंगी होणार आहे.

या मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तसेच, महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला देण्यात आली असून येथून प्रतापराव ढाकणे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या हर्षदा काकडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. या सोबतच विवादीत आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील आणि माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

अपक्ष उमेदवार दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज भरतांना सादर केलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीचे विवरण सुद्धा दिले आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नीसंबंधात कोणतीही माहिती नमूद केलेली नाही.

खरेतर, दिलीप खेडकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीत देखील आपले नशीब आजमावले होते. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना त्यांनी विवाहित असल्याचे म्हटले होते.

पण विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पत्नीसंबंधात कोणतीही माहिती दिलेली नाही. यामुळे दिलीप खेडकर पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्या लग्नाविषयी आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दिलीप खेडकर यांनी प्रतिज्ञापत्रातील उत्पन्नाच्या तपशीलाच्या रकान्यात पाच वर्षांतील आयकर विवरण पत्रातील उत्पन्न लिहिले आहे. पण, लोकसभेला पत्नी म्हणून केलेला उल्लेख विधानसभेला टाळण्यात आला आहे.

पत्नीच्या रकान्यात ‘लागू नाही’ असे लिहिले आहे. तसेच अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या रकान्यातही ‘लागू नाही’ असे लिहिले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत दिलीप खेडकर यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची पत्नी मनोरमा यांच्याविषयी माहिती दिली होती.

मात्र यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नी संदर्भात कोणतीच माहिती दिलेली नाही. संपत्तीबाबत बोलायचं झालं तर त्यांच्याकडे 8.91 लाखांचे सोने असून त्यांच्या मालकीची 31 एकर जमीन आहे.

पनवेल, भालगाव आणि अहिल्यानगरमध्ये दीड कोटी रुपयांचे फ्लॅट आहेत. तसेच, त्यांनी 2022-23 मध्ये 43.59 लाखांचे उत्पन्न दाखवलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe