Ahmednagar Politics : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीची पहिली बैठक सत्ताधारी गटाच्या संचालकानेच होऊ दिली नाही, यामुळे आज दि. २२ जून रोजी बोलावण्यात आलेली पहिलीच बैठक रद्द करण्याची नामुष्की आ. राम शिंदे समर्थक सत्ताधारी गटावर आली. याबाबत आ. रोहित पवार समर्थकांनी ही योग्य संधी साधत विरोधकांमधील बेबनाव दाखवून देताना जोरदार टीकास्त्र सोडले.
विरोधकांचे जोरदार टीकास्त्र
कर्जत बाजार समितीमध्ये नुकताच सभापती उपसभापतींनी पदभार स्वीकारल्यानंतर सभापती काकासाहेब तापकीर यांनी २२ जून रोजी संचालकांची पहिली बैठक आयोजित करून यामध्ये सह्यांचे अधिकार देण्याचा विषय चर्चेला ठेवला होता.
बैठकीसाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी संचालकही बाजार समितीत जमू लागले होते. मात्र त्या अगोदरच सभापती काकासाहेब तापकीर यांनी बाजार समितीचे सचिव सतीश कदम यांना बैठक रद्द करण्याचे आदेश दिले, यावरून सचिव कदम यांनी ही बैठक सभापतींच्या आदेशाने काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली असल्याचे जाहीर केले.
सत्ताधारी गटातील शिवसेना उद्धव गटाचे तालुकाप्रमुख व बाजार समितीचे संचालक बळीराम यादव यांनी बैठकीअगोदरच आक्रमक पवित्रा घेत संचालकांची बैठक होऊ देणार नसल्याचे ठणकावून सांगितले. याबाबत यादव यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती देताना, गेली पाच वर्षे मी संचालक होतो, त्यावेळीही शिवसेनेचा सभापती करण्याचा शब्द दिला होता, तो पाळला गेला नाही, यावेळी आम्ही भाजपाबरोबर प्रामाणिक राहिलो.
पहिलीच बैठक रद्द करण्याची नामुष्की
कुठेही सेनेचा उल्लेख केला जात नाही, या वेळीही शब्द देऊन पद दिले गेले नाही, त्यामुळे आपणच बैठक होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता, असे म्हटले. यानंतर बाजार समितीमधील आ. पवार समर्थक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांनी या सर्व प्रकाराबाबत संताप व्यक्त करत पहिलीच बैठक रद्द करण्याची नामुष्की सत्ताधारी गटावर आली असून, त्यांच्या संचालकांमध्येच अवमेळ असल्याची टीका केली.
सत्ताधाऱ्यांनाच सत्ता मान्य नाही
याबाबत जिल्हा परिषद सदस्य व बाजार समिती संचालक गुलाब तनपुरे यांनी बोलताना आ. पवार हे सर्वांना सोबत घेत मतदारसंघात विकासाचे काम करीत आहेत. मात्र, राम शिंदेंनी विविध आमिषे प्रलोभन दाखवत ओढून-ताणून बाजार समितीची सत्ता ताब्यात घेतली मात्र, सत्ताधाऱ्यांनाच सत्ता मान्य नाही त्यांच्यातील अवमेळाने पहिलीच सभा तहकूब होणे खेदजनक आहे.
ओढून ताणून आणलेली सत्ता फार काळ टिकत नसते.
सभापती उपसभापती आणि सर्व संचालक उपस्थित असताना बेकायदेशीरपणे व अपरिहार्यतेचे कारणे दाखवत सभा रद्द करणे सत्ताधाऱ्यांचं अपयश असल्याची टीका केली. तर काँग्रेसचे बाजार समितीचे संचालक श्रीहर्ष शेवाळे यांनी माजीमंत्री आमदार राम शिंदेंसह नूतन सभापती तापकीर आणि त्यांच्या संचालकांवर टीकास्त्र सोडले. केवळ सत्ताधारी संचालकांतील अवमेळामुळे पहिलीच बैठक तहकूब करण्याची नामुष्की आल्याचं सांगत, स्वतःच्या फायद्यासाठी ओढून ताणून आणलेली सत्ता फार काळ टिकत नसते.
बाजार समितीच्या भवितव्यासाठी धोकादायक
चार दिवसांपूर्वीच माजीमंत्री राम शिंदे यांनी गाजावाजा करीत पदभार घेण्याचा कार्यक्रम केला. मात्र, त्यांच्या संचालकांना तो पटलेला नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बाजार समितीच्या विकासासाठी विरोधक असलो तरी सकारात्मक भूमिका ठेवत बैठकीस आम्ही हजर असताना सत्ताधारी गटातील स्वतच्या संचालकांतील अवमेळामुळे बैठक तहकूब होणे आगामी काळात बाजार समितीच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे, असे म्हटले.