मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेत मोठी फूट पडली यावरुन शिवसेनेमध्ये आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी होत आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरुन देखील या दोन्ही गटामध्ये वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावरुन शिवसेनेने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
शिवसेना हा एकमेव महाराष्ट्रीय बाण्याचा पक्ष आहे. याची पोटदुखी ज्यांना होती, त्यांनीच शिवसेना फोडून आनंदाची विकृत ढेकर दिली. प्रादेशिक अस्मितेस कायमचे खतम करण्याचे डावपेच देशात सुरू आहेत. मुंबईच्या बाबतीत दिल्लीचा विचार सध्या बरा नाही. मुंबईचे महत्त्व कमी करण्याची एकही संधी दिल्लीकर सोडत नाहीत. मुख्यमंत्री शिंदेंना याबाबत वेगळी बूमिका घ्यावी लागेल. भाजपाच्या हो ला हो केलेत, तर मुंबई हातची जाईलच, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे मनसुबे भाजपा तडीस नेईल. तेव्हा शिंदे गट काय करणार?, असा उद्विग्न सवाल सामनामधून केला आहे.
इकडे महाराष्ट्रात शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे समजताच तिकडे बेळगावसह संपूर्ण सीमा भागात मराठी जनांत आक्रोश सुरू झाला. कारण कर्नाटक सरकारने सीमा भागात मराठी बांधवांवर नव्याने दमनचक्र सुरू केल्याचं वृत्त आलंय. मुख्यमंत्र्यांनी बेळगाव-सीमा भागातील मराठी बांधवांवरील अत्याचारांचा विषय पंतप्रधानांसमोर जोरकसपणे मांडायलाच हवा. बेळगावसह सीमाभाग तात्काळ केंद्रशासित करा, ही आपली मागणी त्यांनी पंतप्रधानांसमोर लावून धरली पाहिजे, असे सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हंटले आहे.
कर्नाटकमधील भाजप सरकार शिंदेंचा शब्द खाली पडू देणार नाही, याबाबत आमच्या मनात तरी शंका नाही. शिंदे दिल्लीला शिवसेना फुटीचा, मराठी माणसांच्या एकजूट फोडीचा नजराणाच घेऊन जात असल्याने दिल्लीचे सरकार त्यांना काहीच कमी पडू देणार नाही, असेही सामनामध्ये म्हंटले आहे.