Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेची निवडणूक सुरू होणार आहे. विशेष म्हणजे देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात दररोज वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. विविध राजकीय पक्षांनी आता आगामी निवडणुकांसाठी शड्डू ठोकला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा प्रणित महायुतीचे नेते संपूर्ण राज्यभर दौरा करत आहेत.
दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार यांचा गट) आणि उबाठा शिवसेना यांचे नेते देखील आगामी निवडणुकांसाठी पायाभरणी करू पाहत आहेत. दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात देखील राजकीय सनई-चौघडे वाजू लागले आहेत.
आगामी निवडणुकांसाठी महायुतीने आणि महाविकास आघाडीने अहमदनगर जिल्ह्याकडे विशेष केंद्रित केले आहे. खरेतर अहमदनगर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघाच्या जागा आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण मतदार संघ या दोन जागेसाठी महायुतीकडून आणि महाविकास आघाडी सरकारकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.
अशातच आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. खरेतर महायुती मधून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार मधून ही जागा उबाठा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.
म्हणजे शिर्डी लोकसभेला शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी काटेदार आणि बाणेदार लढाई पाहायला मिळणार आहे. यामुळे अखेरकार या जागेवर कोण अचूक निशाणा साधणार हे देखील पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. तत्पूर्वी मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संवाद दौरे आयोजित करण्यात आले आहेत.
12 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेर येथे शिव संवाद दौऱ्यावर येणार आहेत तर 13 फेब्रुवारीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोनई येथे संवाद दौऱ्यावर येणार आहेत.
माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याचे नियोजन केलेले आहे. यामुळे 12 आणि 13 फेब्रुवारीला शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना होईल आणि यामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघण्याची शक्यता आहे.
शिर्डी लोकसभेसाठी उमेदवार कोण ?
सध्याची परिस्थिती पाहता शिर्डी लोकसभा या जागेसाठी महायुतीकडून शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला अर्थातच उबाठा गटाला या जागेवर उमेदवारी दिली जाईल असे चित्र आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून या जागेवर वर्तमान खासदार सदाशिव लोखंडे यांना तिकीट मिळणार तर दुसरीकडे उबाठा गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट मिळणार अशा चर्चा सुरू आहेत. यामुळे या जागेवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल. परिणामी शिर्डी लोकसभा निवडणूक नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच रंगतदार होणार आहे.