शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटीलच ब्रँड ! पक्षात झालेली बंडखोरी विखे पाटील यांच्या पथ्यावर पडणार ?

Tejas B Shelar
Published:
Shirdi Politics

Shirdi Politics : शिर्डी नाव घेतलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहते ते महसूल मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चित्र. शिर्डी विधानसभा मतदारसंघ म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील म्हणजेच शिर्डी असे हे समीकरण.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग सात वेळा विजयाचा झेंडा फडकवला आहे. शिर्डीत येऊन विखे पाटील यांना टफ फाईट देणे म्हणजेच दुरापास्त असा हा आजवरचा इतिहास.

दरम्यान, यंदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात स्व पक्षातून देखील आव्हान उभे राहिले आहे. विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे उभ्या ठाकल्या आहेत तर दुसरीकडे भाजपात बंडखोरी करून डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी देखील विखे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

मात्र भारतीय जनता पक्षात झालेल्या या बंडखोरीचा फायदा नेमका कोणाला होणार? या नवीन प्रश्नाने आता जन्म घेतलाय. नगरच्या राजकारणात विखे कुटुंबाचा कायमच पगडा राहिला आहे.

विखे कुटुंबाने नगर जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना उघडलाय. यामुळे विखे कुटुंबाला मानणारा एक मोठा गट मतदार संघात आहे. म्हणून विखे यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे.

खरेतर, यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरूध्द माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठबळावर मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रभावती घोगरे असा सरळ दुरंगी सामना पाहायला मिळणार असा अंदाज होता.

मात्र भारतीय जनता पक्षात बंडखोरी झाली. डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. महायुतीने त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र ते उमेदवारीवर कायम राहिलेत.

अर्थातच आता या मतदारसंघात विद्यमान आमदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसच्या प्रभावती घोगरे आणि अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा अशी तिरंगी लढत होणार आहे.

पण भारतीय जनता पक्षात झालेली ही बंडखोरी कोणासाठी फायदेशीर ठरणार ? हा मोठा सवाल आहे. विखे पाटील यांचे समर्थक आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात झालेली ही बंडखोरी विखे पाटील यांच्याच फायद्याची ठरणार असा दावा करत आहेत.

विखे समर्थकांनी आगामी काळात विखे विरोधी मते मिळविण्यासाठी महाविकास आघाडी आणि डॉक्टर राजेंद्र पिपाडा या दोन्ही उमेदवारांमध्ये स्पर्धा निर्माण होईल अन त्याचा फायदा आम्हाला होईल, असा दावा केलाय.

महत्त्वाचे म्हणजे काही राजकीय विश्लेषक देखील असेच मत व्यक्त करत आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला. त्यांनी सलग सात वेळा या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलय.

आता ते आठव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महत्त्वाचे म्हणजे यावेळीही विखे यांचे पारडे जड आहे. विखे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना हरवणे सोपी गोष्ट नाही. दुसरीकडे भारतीय जनता पक्षात जी बंडखोरी झाली आहे ती बंडखोरी विखे विरोधी मत खाणारी असून विखे यांच्या व्होटबँकवर यामुळे काहीच फरक पडणार नाही असे मत काही राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.

शिवाय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी मतदारसंघात आधीपासूनच लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी सभा आणि मेळावे घेत, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करत वातावरण निर्मिती केली आहे.

दरम्यान, आज विखे पाटील यांनी आजवरच्या प्रथेप्रमाणे निझर्णेश्वर येथे शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराचा नारळ फोडलाय. या सभेत त्यांनी अर्थातच थोरातांवर जोरदार हल्ला चढवलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe