Shrigonda News : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला. या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आमदार पाचपुते यांच्या या बालेकिल्ल्यात त्यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिलेली आहे.
प्रतिभा पाचपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला सुद्धा आहे. मात्र विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आणि त्यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते हे त्यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत.
त्यामुळे प्रतिभा पाचपुते यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पाचपुते दांपत्य मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेले होते. मात्र त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी प्रतिभा पाचपुते यांनाच उमेदवारी मिळणार असे जाहीर केले.
पण, पक्षश्रेष्ठीने प्रतिभा पाचपुते यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलेला असतानाही पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे.
दरम्यान, आता श्रीगोंदा विधानसभा उमेदवारीवरून भाजपच्या गोट्यात हालचाली वाढल्या आहेत. यामुळे श्रीगोंद्याचा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाचपुते दांपत्य उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या सुपुत्राच्या उमेदवारीसाठी पुन्हा एकदा लॉबिंग करणार आहेत. यासाठी पाचपुते दाम्पत्य रविवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
त्यामुळे या भेटीकडे श्रीगोंदा सहित संपूर्ण नगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे. यावेळी विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंद्यात पक्षाने ऐनवेळी उमेदवार बदलला तरी फटका बसणार नाही.
उलट मतांची संख्या वाढेल, असा विश्वास व्यक्त केलाय. तथापि उद्या देवेंद्र फडणवीस आमदार बबनराव पाचपुते आणि त्यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांच्या या आग्रही मागणीवर काय निर्णय घेतात? पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते यांना खरंच भारतीय जनता पक्ष उमेदवारी देणार का? ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.
पण, विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते आणि पाचपुते यांचे कार्यकर्ते विक्रम भैया यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत.
पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विक्रम भैया यांना उमेदवारी मिळायला हवी अशी मागणी केली जात आहे. यासाठी त्यांनी पाचपुते दांपत्याकडे विनंती केली असून कार्यकर्त्यांची ही भावना आपण पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचू आणि योग्य तो निर्णय होईल अशी प्रतिक्रिया विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली आहे.
दरम्यान उद्या बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते हे आपल्याला एकाला उमेदवारी मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावणार आहेत. यामुळे फडणवीस आणि पाचपुते दांपत्यात होणाऱ्या या बैठकीकडे साऱ्या राज्याचे लक्ष राहणार आहे.