Shrigonda News : महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून आता प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या नुसताच प्रचार सभांचा झंझावात सुरु आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या जागेवर महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विक्रम पाचपुते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ते विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र. खरे तर श्रीगोंद्याचा हा मतदारसंघ पाचपुते यांचा बालेकिल्ला. दरम्यान याच बबनराव पाचपुते यांच्या बालेकिल्ल्यात विक्रम दादा हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महत्वाचे म्हणजे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज पासून होणार आहे. विक्रम पाचपुते यांच्या निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हजेरी लावणार आहेत.
केंद्रीय मंत्री शिंदे आज गुरुवार दि. 7 नोव्हेंबर 2024 ला दुपारी दोन वाजता संत श्री शेख मोहम्मद महाराज प्रांगणात येणार आहेत. इथं महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या जाहीर सभेतूनच विक्रम दादांच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. याप्रसंगी अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत.
या जाहीर सभेची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिलीये. ज्योतिरादित्य सिंधीया आणि श्रीगोंदा याची एक वेगळी नाळ आहे. ज्योतिरादित्य सिंधिया अर्थातच शिंदे हे श्रीगोंदा नगरीचे राजे महादजी शिंदे यांचे वशंज आहेत.
म्हणून श्रीगोंदा तालुक्याविषयी शिंदे यांच्या मनात नेहमीच प्रेम राहिले आहे. म्हणून तालुक्यातील युवकांच्या शिक्षणासाठी शिंदे घराण्याने आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या मागणीनुसार रयत शिक्षण संस्थेला श्रीगोंदा शहर परिसरातील वाडे व ८०० एकर जमीन दान दिली आहे.
ज्याप्रमाणे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मनात श्रीगोंदा तालुक्यासाठी प्रेम आहे त्याचप्रमाणे श्रीगोंदा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये देखील शिंदे घराण्याविषयी कायम आदराची भावना राहिली आहे.
दरम्यान हेच ज्योतिरादित्य शिंदे आज विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. यामुळे शिंदे यांच्या जाहीर सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आहे. खरे तर विक्रम दादा पाचपुते यांनी अगदी साध्या पद्धतीने निवडक कार्यकर्त्यांसमवेत अर्ज सादर केला होता.
यामुळे प्रचाराचा शुभारंभ हा मोठा राहणार आहे. विक्रम दादा पाचपुते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत अन यावेळी श्रीगोंदा शहरातून भव्य रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. श्रीगोंदा बसस्थानक ते शनी चौक अशी रॅली काढली जाणार आहे.
यामुळे रॅली व सभेसाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष नागवडे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.