राजकारण

Shrigonda Politics : नागवडे दाम्पत्याचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश ! श्रीगोंदा तालुक्यात अजित पवार गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार

Published by
Sonali Shelar

Shrigonda Politics : श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष राजकारणात वर्चस्व असलेले काँगेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे बांनी रविवारी दि.११ रोजी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या प्रमुख समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

रविवारी दि.११ रोजी पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक मेळाव्यात राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,

अन्न व पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा, माजी आमदार रमेशआप्पा थोरात यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत दाखल झाले.

नागवडे दाम्पत्याच्या प्रवेशाबाबत मागील महिन्यामध्ये स्व. शिवाजीबापू नागवडे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती सूचक मानली जात होती.

ना. पवार यांनी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने नागवडे कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते.

त्यातच नागवडे दांपत्याने विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढविण्याचा निर्धार करत मागील आठवड्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्यात कार्यकत्यांनी आता माघार नाही असा पवित्रा घेत जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची आग्रही भूमिका मांडली होती.

श्रीगोंदा तालुक्यात नागवडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. साखर कारखान्याच्या, शिक्षण संस्थांच्या माध्यमांतून नागवडे यांचे तालुक्यात कार्यकत्यांचे मोठे जाळे आहे. याचा मोठा फायदा आता राष्ट्रवादीला होणार आहे.

नागवडे यांच्या पक्षप्रवेशामुळे श्रीगोंदा तालुक्यात अजित पवार गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असून लोकसभेनंतर होणारी विधानसभा निवडणूक लक्षवेधी अशीच असणार आहे.

नागवडे दाम्पत्याने राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारीची दावेदारी केलेली असल्याने श्रीगोंदाचे राजकारण आता मोठं लक्षवेधी होणार असून, याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

अनेक कार्यकर्ते नागवडे यांच्यासोबत…
नागवडे दांपत्यासोबत दिपक नागवडे, बाबासाहेब भोस, धनसिंग भोयटे, राकेश पाचपुते, सखाराम जगताप, ज्ञानदेव गवते, आप्पासाहेब धायगुडे, बंडु जगताप, शरदराव नवले,

माधुरी आदेश नागवडे, सुरेखा सुभाष शिर्के, सुरेखा किसनराव लकडे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

नागवडे दांपत्याने काँग्रेसची पुन्हा साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने नगर जिल्ह्यासह श्रीगोंदा तालुक्यात कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

राष्ट्रवादी प्रवेशासाठी राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा, माजी आमदार रमेश आप्पासाहेब थोरात, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष मितेश नाहटा, जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांची मध्यस्ती कामी आली.

Sonali Shelar