Shrigonda Politics News : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळ जनक बातमी समोर येत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांकडून जोरदार वातावरण निर्मिती सुरू आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांकडून जोर लावला जात आहे.
श्रीगोंद्यात यावेळी महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विक्रम पाचपुते आणि महाविकास आघाडी कडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अनुराधा नागवडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातुन एक मोठी बातमी हाती आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे श्रीगोंदा चे अधिकृत उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या मालकीच्या MH 12 UV 2525 या नंबर प्लेटच्या स्कॉर्पिओ वाहनातून दोन लाख रुपयांची रोकड पकडण्यात आली आहे.
पोलिसांनी यावेळी वाहन सुद्धा ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्या नगर शहरातील आयुर्वेद कॉर्नर येथे नाकाबंदी दरम्यान कोतवाली पोलीस स्थानकातील पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नागवडे यांच्या वाहनात स्वतः त्यांचा मुलगा दिग्विजय राजेंद्र नागवडे वय 20 वर्ष राहणार वाघंदरी तालुका श्रीगोंदा, विनेश राजसिंह शिर्के वय 26 वर्ष राहणार बाबुर्डी तालुका श्रीगोंदा, ईश्वर अंबर मेहत्रे वय 25 वर्ष राहणार आढळगाव तालुका श्रीगोंदा, अविनाश बाळू इथापे राहणार श्रीगोंदा फॅक्टरी तालुका श्रीगोंदा हे चौघेजण आयुर्वेद कॉर्नर येथून स्कॉर्पिओ या वाहनातून जात होते.
यावेळी त्यांच्या वाहनाची कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तपासणी केली. तपासणी दरम्यान शिर्के यांच्याकडे एक लाख, अविनाश इथापे यांच्याकडे 50 हजार, ईश्वर मेहत्रे यांच्याकडे 50 हजार अशी दोन लाख रुपयांची रोकड आढळली आहे.
या रकमेबाबत या लोकांना पोलिसांकडून विचारना करण्यात आली होती. मात्र सदर रकमेबाबत त्यांनी असमाधानकारक उत्तर दिले. खरे तर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 50 हजारापेक्षा जास्त रक्कम आचारसंहिता काळात जवळ बाळगण्यास निर्बंध आहेत.
मात्र असे असतानाही या लोकांनी 50 हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जवळ बाळगल्याचे आढळून आले असल्याने पोलिसांनी सदर रक्कम आणि स्कॉर्पिओ वाहन जप्त केले आहे. तसेच सदर रक्कम चौकशीसाठी समिती वर्गाकडे वर्ग करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी ही माहिती दिली.