Shrirampur Politics News : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा झंझावात सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या फायर ब्रँड नेत्यांकडून आपापल्या उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांच्या फुटी नंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि यामुळे या निवडणुका विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक देखील फारच लक्षवेधी ठरणार आहे. दरम्यान, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. या मतदारसंघात महायुतीमध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. महायुतीत या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होणार असे संकेत आता मिळत आहेत.
खरे तर, या जागेवर महायुतीकडून अजित पवार गटाने विद्यमान आमदार लहू कानडे यांना तिकीट दिले आहे. दुसरीकडे शिंदे गटाने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी आपला अर्ज भरत उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे महायुतीचा नेमका अधिकृत उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित होत होता.
याच संदर्भात अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री अन भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लहू कानडे अर्थातच अजित पवार गटाचे उमेदवारच महायुतीचे अधिकृत उमेदवार असे ठणकावून सांगितले होते. भाऊसाहेब कांबळे आता बस्स झालं, प्रचारात माझा फोटो वापरू नका, तुम्ही विश्वासघात केलाय, असा इशाराच त्यांनी दिला होता.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच राधाकृष्ण विखे पाटील यांनी कांबळे यांना इशारा दिला आणि आता त्यांनीच या जागेवर महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असे म्हटले आहे. खरेतर, शिवसेनेचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी सभा घेणार असल्याची माहिती दिली.
यामुळे, राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात. दरम्यान आता विखे पाटलांकडून या चर्चांच्या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत स्वतः विखे पाटलांकडूनच मिळू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी कांबळे यांनी आमच्यासोबत दगा फटका केलाय, वेळेत कानडे यांना पाठिंबा द्या, कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार अशी गर्जना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
पण आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी, भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज मागे घेऊ, असे मला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मी त्याबद्दल भाऊसाहेब कांबळे यांना सांगितले होते. मात्र नंतर काय झाले माहित नाही. अर्ज माघारीच्या दिवशी ते नॉटरिचेबल झाले. भाऊसाहेब कांबळे उभे राहणार असतील तर महायुतीच्या दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल.
मात्र जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला कळवण्यात आले होते. त्यामुळे कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे मी जाहीर केले. मात्र मुख्यमंत्र्यांना वाटतं असेल की भाऊसाहेब कांबळे हेच त्यांचे उमेदवार आहेत. तर शेवटी मुख्यमंत्री राज्याचे नेते आहेत. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे म्हणतं श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असेचं जाहीर केले आहे.