Shrirampur Politics : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये बंडखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महायुती मधील बंडखोरी रोखण्यासाठी महायुतीचे सर्वच घटक पक्ष जीवाचे रान करताना दिसत आहेत.
भारतीय जनता पक्ष, अजित पवार गट आणि शिंदे गट बंडखोरी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा या परिस्थितीतच मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये एक वेगळाच राजकीय पेच तयार झाला आहे.
यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढत आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली असून कांबळे यांनी आपला अर्ज देखील भरला आहे.
दुसरीकडे अजित पवार गटाकडून आमदार लहू कानडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. एवढेच नाही तर शिंदे गटातील माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांचे सुपुत्र यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यामुळे या जागेवर कोण माघार घेणार हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. पण अशा या परिस्थितीतच शिंदे गटाचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे सध्या नॉट रीचेबल आहेत.
दुसरीकडे अजित पवार गटाचे उमेदवार लहू कानडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. ते थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून कोण माघार घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
दरम्यान श्रीरामपूर मतदारसंघाकडे महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे लक्ष आहे. महायुतीत निर्माण झालेला हा राजकीय पेचं सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून यावर महायुती काय तोडगा काढणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.
महायुती चा नेमका उमेदवार कोण असेल, कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार या सर्व गोष्टी सायंकाळपर्यंत क्लिअर होणार आहेत. पण जर येथून कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे.
साहजिकच याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे. म्हणून आता या मतदार संघात नेमके काय होणार, अंतिम लढत कशी राहणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.