Shrirampur Vidhansabha Matdarsangh : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार सभांचा धुमाकूळ सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने प्रचारासाठी कंबर कसली आहे. पण, प्रचाराला सुरुवात झाली असूनही श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नेमके कोण हा प्रश्न उपस्थित होत होता.
खरंतर, या जागेसाठी महायुतीच्या अजित पवार गटाने विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी जाहीर केलीये. आमदार कानडे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश घेतला त्यानंतर त्यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली.
दुसरीकडे शिंदे गटाने भाऊसाहेब कांबळे यांना देखील एबी फॉर्म दिला होता. भाऊसाहेब कांबळे यांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा विषय निघाला तेव्हा कांबळे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितले गेले. पण ते नॉट रिचेबल झालेत. यामुळे मात्र श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मोठा पेच तयार झाला.
दरम्यान आता याच साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार कोण आहेत? हे ठणकावून सांगितले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मतदार संघातील गोंधवणी येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचाराची शुक्रवारी सुरुवात झाली.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील या मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हे लहू कानडेच आहेत. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दगाफटका केलाय. म्हणून त्यांना आता माफी नाही, असे विधान केले आहे. या प्रचार सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अरुण नाईक, उपसभापती अभिषेक खंडागळे, माजी जि.प. सदस्य शरद नवले, नितीन दिनकर, कैलास बोर्ड, अमृत धुमाळ, महंमद शेख, मुक्तार शाह इत्यादी लोक उपस्थित होते.
विखे पाटील यांनी उमेदवारी बाबत बोलतांना आमदार कानडे यांच्यासारख्या नेत्याला थोरात यांनी उमेदवारी दिली नाही. मात्र त्यातून कानडे हे महायुतीचे उमेदवार झाले ही चांगली गोष्ट घडलीये. आता त्यांना निवडून आणण्याची ग्वाही मी येथे देत आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी आमचा विश्वासघात केला, असं म्हणतं राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
अर्ज माघारीच्या वेळी ते नॉट रिचेबल झाले होते. आता त्यांनी वेळीच थांबावे, अन्यथा त्यांना माफी नाही. महायुतीचे अधिकृत उमेदवार कानडे हेच आहेत. यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी कोणतीही शंका बाळगू नये, असे सुद्धा विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
एकंदरीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजित पवार गटाचे लहू कानडे हेच आहेत असे पालकमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले. तसेच कांबळे यांनी वेळेत थांबावे अन्यथा त्यांना माफी नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.