अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इंपिरियल चौकातील पुतळ्याच्या आसपास उघड्यावर अश्लिल चाळे करणार्यांवर कारवाई करावी,
अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा पोलिस उप अधिक्षक संदिप मिटके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, या परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.
कारण या परिसरात संध्याकाळ पासून काही महिला वेश्याव्यवसायाच्या दृष्टीने उभ्या असतात आणि काही आंबटशौकीन माणसं त्या ठिकाणी महिलांसोबत नको ते चाळे करत उभे असतात.
जुन्या बसस्थानकापासून ते थेट जिल्हा परिषदेच्या आवारापर्यंत या करामती चालत असतात. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पोलिसांच्या गाडीच्या टायमिंग वर सर्व काही खेळ त्या ठिकाणी चालू असतो.
हा विषय या आधी प्रशासनाला माहिती नसेल असेही नाही, पण कोणत्या कारणामुळे या गोष्टींकडे डोळेझाक करण्यात आली, याची देखील आपण चौकशी करावी. संबंधित महिला त्या ठिकाणी ज्या उद्देशाने उभ्या असतात,
त्या अवैध धंद्यांसाठी ती जागा नाही, त्या जागेचे पावित्र्य हे कायम राखले गेले पाहिजे. असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी पोलिस निरिक्षक संपत शिंदे,
मनसे विद्यार्थीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, संकेत जरे, प्रमोद ठाकूर, धिरज सारसर, पांडूरंग पालवे, प्रविण गायकवाड आदि उपस्थित होते.