राजकारण

नगर दक्षिणमध्ये पुन्हा सुजयपर्व की निलेश लंके ? कार्यकर्त्यांत पैंजा लागल्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहिल्यानगर दक्षिण लोकसभा निवडणूक मोठ्या चुरशीची झाली. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र खा. डॉ. सुजय विखे हे पुन्हा एकदा भाजपा महायुतीकडून उमेदवार असल्याने मंत्री विखे यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली असून,

विरोधात असलेले शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार पारनेरचे आ. निलेश लंके यांनीदेखील आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या पाठबळावर ही निवडणूक लढवली.

ही निवडणूक लंके यांची पुढील राजकीय कारकीर्द ठरवणारी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. भाजपा महायुतीचे उमेदवार खा.डॉ. सुजय विखे सन २०१९ मध्ये या मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीचे आ. निलेश लंके हेदेखील पारनेरचे आमदार म्हणून विधानसभेत निवडून आलेले आहेत.

सन २०१९ च्या निवडणुकीत आणि सन २०२४ च्या निवडणुकीची आताची परिस्थिती पाहता राजकीय उलथापालथ व राज्याच्या राजकारणातील घडामोडींमुळे परिस्थिती बदलली आहे. विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,

माजीमंत्री प्रा. राम शिंदे, पंकजा मुंडे व राज्याचे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, या राजकीय दिग्गजांनी सभा घेतल्या आहेत. तर लंके यांच्या प्रचारादरम्यान माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्यासह खा. संजय राऊत, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील व आ. रोहित पवार यांनी लोकसभा मतदारसंघात सभा घेऊन शेवटपर्यंत निवडणुकीचे वातावरण तापते ठेवले.

१३ मे रोजी मतदान झाल्यानंतर दक्षिणेमध्ये कोण निवडून येणार व कोण पराभूत होणार, याबाबत चर्चा रंगल्या असता, एकीकडे दक्षिणेत महाविकास आघाडीचे उमेदवार आ. निलेश लंके निवडून आले तर? त्यांची पुढील राजकीय कारकीर्द फायद्याची असेल तसेच जिल्ह्याची राजकीय समीकरणेही बदलतील. तर दुसऱ्या बाजूने पाहिल्यास भाजपा महायुतीचे उमेदवार खा.डॉ. सुजय विखे विजयी झाल्यास ते केंद्रातील भाजपा सरकार आल्यास सत्तेत मंत्री पदाचे दावेदार असतील.

अशी अनेक जणांची भावना असून, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजयपर्व ही राजकीय वाटचाल यशस्वी होणार, याबाबत दावा करणारे तर दुसऱ्या बाजूला दक्षिणेमध्ये पुन्हा सुजयपर्व का निलेश लंके, याबाबत चर्चा करताना दिसत आहेत. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात निवडणुका पार पडल्या. आता ४ जूनला लागणाऱ्या निकालाकडे मतदारसंघासह राज्यातील आम जनतेचे लक्ष लागून आहे.

या मतदारसंघातील राजकीय घडामोडी पाहता निवडणुकीत आरोप प्रत्यारोप तर झालेच. यामध्ये विखे पवार यांच्या प्रतिष्ठेचा विषय व विकासाचा मुद्दा मांडल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे कर्जत जामखेड मधून माजी मंत्री आ. प्रा.राम शिंदे व आ.रोहित पवार या दोन्ही आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजून कोण जास्तीत जास्त आपल्या उमेदरावाला मताधिक्य देतो, याकडे लक्ष देवून गाव-वस्ती वाड्या पिंजून काढल्या आहेत.

याचा नेमका कोणाला फायदा होणार, हे निकालानंतर कळेल. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी ६० टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याने या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. यामुळे जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असेल, हा येणार काळच ठरवेल.आता सध्यातरी सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्त्यांमध्ये विखे विजयी होणार का लंके विजयी होणार, याबाबतच्या पैंजा लागल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office