Sujay Vikhe Patil News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर प्रचार सभांचा झंझावात सुरू आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात देखील महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या प्रचार सभा घेतल्या जात असून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे.
शिर्डीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ देखील महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे देखील आपल्या वडिलांच्या प्रचारार्थ सक्रिय असून ते सध्या शिर्डी विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढताना दिसत आहेत.
अशातच, सध्या शिर्डी मध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुजय विखे पाटील ‘शिर्डी मतदारसंघात माझे ग्रहमान सुस्थितीत राहतात. मात्र शिर्डी सोडली की माझे ग्रहमान बदलतात. त्यामुळे मी सध्या शिर्डी मतदारसंघातच थांबून आहे,’ असे मिश्किल वक्तव्य पुन्हा करताना दिसत आहेत.
दरम्यान सुजय विखे पाटील यांनी विखे पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील जोरदार हल्ला चढवला आहे. सुजय विखे पाटील यांनी, ‘मतदारसंघात विखे पाटलांची दहशत असल्याचा आरोप म्हणजे विरोधकांनी केलेला सर्वात मोठा जोक आहे.
विरोधकांच्या सभेत जामर लावायला ते काही प्रधानमंत्री किंवा गृहमंत्री नाहीत. त्यांच्या जनरेटरला संगमनेरहून डिझेल न आल्याने सभेच्यावेळी त्यांची लाईट जाते. जामर लागले हे १०० टक्के खरे आहे. पण ते विरोधकांच्या डोक्याला लागले आहेत.
मी संगमनेरमध्ये चार सभा घेतल्या त्यामुळे ते जाम झाले आहेत,’ असा उपरोधिक टोला माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी यावेळी बाळासाहेब थोरात यांना लगावला आहे. यावेळी सुजय विखे पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे.
ते म्हटलेत की, ‘आमच्या विरोधात शरद पवार सभा घ्यायला येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र हा सगळा फुगा असून शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनता नेहमीच विखे पाटील परिवारासोबत राहिली आहे.’ एकंदरीत सध्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी मधील नेते एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे आणि थोरात यांच्यामधील राजकीय संघर्ष आणखी उफाळून आला आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील तसा हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता देखील आहे. तथापि शिर्डी विधानसभा मतदारसंघात म्हणजे विखे पाटील यांच्या बालेकिल्लात नेहमीप्रमाणेच राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडीवर आहेत.
विखे पाटील यांच्या माध्यमातून सध्या मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू असून मतदारांकडूनही त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. पण, शिर्डी मध्ये यावेळी काही उलटफेर होणार की पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील हेच किंग ठरणार या सर्व गोष्टी 23 तारखेला म्हणजेच मतमोजणीला क्लिअर होणार आहेत.