Sujay Vikhe Patil News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलय. राज्यात सर्वत्र प्रचारसभांचा धुराळा उडत आहे. महाविकास आघाडी प्रमाणेच महायुती मधील फायर ब्रँड नेते देखील आता आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसून सज्ज झाले आहेत.
नेत्यांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील केले जात आहेत. अशा या राजकीय वातावरणात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या एका भाषणाची आता चर्चा सुरू झाली आहे.
खरंतर सुजय विखे पाटील यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. अवघ्याच काही हजाराच्या मतांनी सुजय विखे पाटील पराभूत झालेत. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर करडी नजर ठेवून असलेल्या राजकीय विश्लेषकांना सुजय विखे पाटील हेच पुन्हा एकदा खासदार बनणार असे वाटत होते.
पण ऐनवेळी राजकीय समीकरणे फिरलीत आणि लंके यांनी लोकसभेच्या निवडणुकीत बाजी मारली. यानंतर सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला अन यासाठी त्यांनी तयारी सुरू केली. सुजय विखे पाटील यांनी थेट संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार बोलून दाखवला.
या अनुषंगाने सुजय विखे पाटील यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली. संगमनेर चे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गावी जाऊन सुजय विखे पाटील यांनी तुम्ही त्यांना 40 वर्षे दिलीत पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाच वर्ष द्या असे म्हणत बाळासाहेब थोरात यांना थेट आव्हान दिले.
विखे-पिता पुत्र यांचे संगमनेर मधील दौरे देखील वाढले होते. स्वतः सुजय विखे पाटील हे काही दिवस संगमनेर मध्ये तळ ठोकून बसले होते. म्हणून जर माजी खासदार सुजय विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात लढत झाली तर संगमनेरची लढत राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत बनेल अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.
पण, ऐनवेळी संगमनेरची जागा महायुतीकडून शिंदे गटाला गेली आणि येथून सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीचा पत्ता कट झाला. पण हा पत्ता कट का झाला? हे सबंध महाराष्ट्राला ठाऊक आहे. खरे तर संगमनेर मध्ये वातावरण निर्मिती करत असताना सुजय विखे पाटील यांच्या एका जाहीर सभेत भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. याप्रकरणी देशमुख यांना अटक देखील झाली.
खरे तर वसंतराव देशमुख यांच्या याच वक्तव्यामुळे सुजय विखे पाटील यांना संगमनेर मधून उमेदवारी न देण्याचा निर्णय झाला. दरम्यान आता याचीच खंत माजी खासदारांच्या तोंडून व्यक्त झाली आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या एका प्रचार सभेत बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका करत महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावं, असं आवाहन केलं. तसेच त्यांनी त्यांच्या राजकारणाविषयी अन गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्यासोबत जे काही घडले त्यासंदर्भात सुद्धा भाष्य केलंय. ते म्हणालेत की, लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नाहीत.
लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत चांगलं वातावरण असताना नंतर अचानक काय झालं माहिती नाही. माझा पराभव झाला. माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. संगमनेरमध्ये देखील आपल्या सभांना गर्दी पाहून सर्वांना वाटलं की मी आमदार होणार. तशी चर्चा सुरू झाली.
मात्र वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली, असे विधान सुजय विखे पाटील यांनी केले. दरम्यान सुजय विखे पाटील यांच्या याच विधानाची सध्या नगरच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. या निमित्ताने त्यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून देत विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट का गेलं? हेही सांगून टाकलं आहे अशा चर्चा मात्र सुरू झाल्यात.