राजकारण

सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahilyanagar Politics : अकोळनेर येथे डॉ. सुजय विखे पाटील, आ. शिवाजीराव कर्डिले आणि आ. काशिनाथ दाते यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की, “दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि करत राहीन. मला नाकारले गेले तरीही, माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अकोळनेर येथे प्रतीक दादा युवा मंचच्या वतीने आयोजित या भव्य सत्कार समारंभात डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, विक्रम पाचपुते तसेच लाडक्या बहिणींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. विखे पाटील म्हणाले, “पारनेर विधानसभा मतदारसंघातील सत्तांतरामुळे तालुका सुरक्षित राहिला आहे. बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले. यासाठी मी पारनेरमधील महिलांसह समस्त जनतेचा मनापासून आभारी आहे.” असे मत मांडून त्यांनी सत्तांतर समाजहितासाठी कसे गरजेचे होते आणि त्यासाठी नागरिकांनी दिलेला कौल कसा परिणामकारक ठरेल यावर भाष्य केले.

साकळाई योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचा निर्धार

डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाई योजनेच्या अंतर्गत अकोळनेरला पाणीपुरवठा करण्याचा निर्धार देखील यावेळी बोलून दाखवला. ते म्हणाले, “नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्रीपद मिळाल्याचा जिरायत भागाला मोठा फायदा होणार आहे. निश्चितच परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल व आमदार शिवाजीराव कर्डिले आणि काशिनाथ दाते यांच्या सहकार्याने पाणीपुरवठा लवकरच पूर्ण होईल आणि समस्त शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल”, असे स्पष्ट केले.

तसेच ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साकळाई योजनेचा प्रश्न ही सोडविला जाईल व नागरिकांच्या मागणीला यश मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच जो आपल्या गावासाठी पाणी देईल, त्यालाच पाठिंबा द्या, असे आवाहन देखील डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनतेला केले. तसेच “जो संकटाच्या काळात आपल्या बाजूने नाही, त्याला संघटनात स्थान नाही.” असे देखील मत मांडून कठीण प्रसंगी साथ सोडणाऱ्यांना त्यांनी टोला लगावला.

अहमदनगर लाईव्ह 24