अमरावती : महाविकास आघाडीत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भाजपसोबत येण्याच्या चर्चांना वाव मिळाला आहे. स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी भाकित केलं की, उद्धव ठाकरे पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील.
रवी राणा आणि त्यांच्या पत्नी, माजी खासदार नवनीत राणा यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी एकत्र पतंग उडवून आनंद लुटला. यावेळी रवी राणा यांनी ठाकरेंच्या भविष्यातील भूमिका आणि त्यांची भाजपसोबत जवळीक वाढण्याबद्दल मोठे शब्द वापरले.
त्यांची पतंग जनतेने विधानसभेला कापली
“आमच्या महायुतीच्या पतंगाची उंची पाहून अनेकांच्या पतंगाची डोर कापली जाईल,” अशी टिप्पणी रवी राणांनी केली. तसेच, “नवनीत राणांची पतंग लोकसभेला चुकीच्या पद्धतीने कापणाऱ्यांची पतंग जनतेने विधानसभेला कापली,” अशी टीकाही त्यांनी माजी आमदार बच्चू कडू यांच्या बद्द्दल केली.
पराभवानंतर त्यांनी अमरावतीच्या विकासासाठी एकत्र
मकर संक्रांतीच्या निमित्ताने रवी राणांनी बच्चू कडूंना आवाहन करत, “तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पराभवानंतर त्यांनी अमरावतीच्या विकासासाठी एकत्र यायला पाहिजे. आमदार प्रवीण तायडे यांच्यावर विश्वास ठेवा,” असं म्हटलं.
ठाकरे मकर संक्रांतीपर्यंत फडणवीसांसोबत
रवी राणा यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे, मकर संक्रांतीपर्यंत फडणवीसांसोबत दिसतील, असे भाकित मी करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व खुल्या मनाने स्वीकारलं, तर हे नक्कीच घडेल, असा विश्वासही रवी राणा यांनी यावेळी बोलावून दाखवला.
युवा स्वाभिमानी पक्षाची तयारी
रवी राणा यांनी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबतही विधान केलं. ते म्हणाले, “युवा स्वाभिमानी पक्ष महायुतीच्या उंचीवर भरारी घेईल, आणि आम्ही पूर्ण ताकदीने येणाऱ्या निवडणुकीत सहभागी होऊ.”