Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणूक तोंडावर येताच उमेदवारांच्या राजकीय हालचाली वाढू लागतात. महाराष्ट्रात सध्या काही मतदारसंघ खूपच चर्चेत आहेत. यात एक अहमदनगर मतदारसंघ जास्तच चर्चेत आहे.
याचे कारण म्हणजे या मतदार संघात भाजपकडून खा. सुजय विखे हे भाजपकडून उभे असतील हे जवळपास निश्चित आहे. परंतु त्यांच्याविरोधात असणारी पक्षांतर्गत व्यक्तींचीच नाराजगी, तसेच विरोधात उभे राहण्यासाठी
इच्छुक उमेदवारांची संख्या पाहता या मतदार संघाची चर्चा जास्त वाढली आहे. त्यामुळे आता नगर दक्षिण लोकसभा निवडणूक चांगलीच गाजणार असे चित्र तयार झाले आहे.
शरद पवार गटाची पावले
लोकसभेसाठी सुजय विखे यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून पाऊले उचलली जात असून त्यापद्धतीने नियोजन सुरु आहे. एक प्रबळ उमेदवार विखेंविरोधात उभे करण्याचे सध्या शरद पवार गटाचे नियोजन सुरु आहे.
त्यात आता अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी आपण लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे आता या दोघांपैकी शरद पवार गटात कोण येणार का? याकडे देखील लक्ष लागले आहे.
आ. प्राजक्त तनपुरे उभे राहण्याची शक्यता
अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. येथे राष्ट्रवादीचे तब्बल सहा आमदार आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाकडे आ.तनपुरे व आ. रोहित पवार हे दोन आमदार राहिले आहेत. अहमदनगरवर आता पुन्हा एकदा आपली पकड निर्माण करण्यासाठी स्वतः शरद पवार प्रयत्नशील झाले आहेत.
विखेंना टक्कर देईल असा प्रबळ उमेदवार आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितल्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पक्षाने आदेश दिले तर निवडणूक लढवू असे स्पष्ट केले.
आ. निलेश लंके यांच्या पत्नी रिंगणात
आमदार निलेश लंके हे सध्या अजित पवार गटात आहेत. ते जर शरद पवार गटात गेले तर त्यांना लोकसभेचे तिकीट दिले जाईल हे निश्चित मानले जात आहे. पारनेरमधील हांगामध्ये झालेल्या एका कार्य्रक्रमात खुद्द अजित पवार यांनी लंकेंना लोकसभेसाठी पाठबळ जाहीर केल्यानंतर चर्चाना ऊत आला.
परंतु जर ही जागा भाजपकडे असेल तर अजित पवार यांचा प्रश्नच येत नाही. परंतु आता आमदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी स्वतः आपण नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहीरपणे बोलून दाखवल्याने त्या शरद पवार गटात जाणार का? असा सवाल केला जात आहे.
शिंदेंमुळे विखेंना पक्षांतर्गतच आव्हान ?
कर्जत जामखेड चे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांनी देखील खासदारकीला उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यात विखे व शिंदे यांचे अंतर्गत शीतयुद्ध देखील लपून राहिलेलं नाही. विधानसभेला विखेंमुळेच पराजय झाला असे ते मानत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते.
तसेच शिंदेंनी विखेंचे विरोधक कोल्हे व निलेश लंके यांच्याशी जवळीक केल्याने राजकीय अडचण निर्माण झाली आहे. यामुळे आता विखे यांना पक्षातूनच आव्हान मिळत असल्याचे दिसत असल्याने सध्या विखे यांना मोठी फाईट मिळेल असे चित्र आहे.