राजकारण

विधानसभेला सगळ्यात मोठी लढत अहमदनगर जिल्ह्यात होणार ? ह्या मतदारसंघात रंगणार पवार विरुद्ध पवार सामना ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : कर्जत-जामखेड मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीत पवार विरूध्द पवार अशी लढत पहावयास मिळण्याची शक्यता असून, या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील अनेकांशी चर्चा सुरू केली असल्याची

खात्रीलायक माहिती मिळत आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागणार असून दोन्ही पवार एकत्र आहेत हा समज खोडून काढण्यासाठी अशी लढत झाल्यास राज्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.

कर्जत-जामखेड मतदार संघात आ. रोहित पवार यांनी गेली तीन वर्षात अनेक कामे करत व मोठी यंत्रणा उभी करत चांगलेच पाय रोवले. दरम्यान माजी आमदार प्रा. राम शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली, राज्यात सत्तांतर झारले,

मतदार संघात पवार शिंदे असा कलगीतुरा रंगला, एमआयडीसीच्या निमित्ताने राज्यात हा मतदार संघ गाजला. त्यानंतर राष्ट्रवादी मध्येही उभी फूट पडली. त्यामुळे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून आ. रोहित पवार यांना आता महाराष्ट्र खुणावू लागला आहे.

त्याची वक्तव्ये आ. राम शिंदे वर येत असतानाच आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ही येऊ लागली आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात दोन्ही पवार गट एकच आहेत की वेगवेगळे हा संभ्रम जरी निर्माण झाला असला तरी सर्व पवार आतून एकच असल्याचे बोलले जात असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघामध्ये लक्ष घालत आराखडे बांधण्यास सुरुवात केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.

तर दुसरीकडे भाजपाचे आ. राम शिंदे यांनी सद्या खासदारकीसाठी जोरदार शडू ठोकल्याचे पहावयास मिळत असून ते उघडपणे आव्हान देत आपल्याला तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत.

विधान परिषदेवर संधी मिळाल्याने आ. शिंदे कर्जत जामखेड लढवतीलच याबाबत अनेकांना शाश्वती नाही. याशिवाय राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या विजयी जागा महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मिळणार आहेत.

त्यामुळे कर्जत जामखेड मतदार संघाची जागा या जागा वाटपाच्या सूत्रानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळणार असल्याने या जागेसाठी ते विशेष सक्रिय झाल्याची चर्चा होत आहे.

यासाठी त्यांनी चाचपणी सुरू केली असून कर्जत जामखेड तालुक्यातील अनेक नेत्यांबरोबर ते स्वतः चर्चा करत असल्याची माहिती हाती आली आहे.

कर्जत तालुक्यातील अनेक राष्ट्रवादीचे नेते, भाजपातील नेत्यांनी त्यांची भेट ही घेतली असून तालुक्यातील एका सरपंचाकडून या महितीस खात्रीशीर दुजोरा मिळाला आहे. कर्जत तालुक्यात गेली दोन तीन वर्ष आ. रोहित पवार यांच्या बरोबर असलेले अनेकजण सध्या त्याच्या कार्यपद्धतीवर नाराज असून,

त्यातील बरेच जणांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे तर काही पदाधिकारी थेट अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. आगामी काळात कर्जत जामखेड मतदार संघात पवार कुटुंबियातीलच उमेदवार पुढे आला तर पवार विरुद्ध पवार हा सामना रंगतदार होऊ शकतो. मात्र असे होईल का याबाबत ही शंका उपस्थित केल्या जात आहेत.

मोठ्या विश्वासाने कर्जत शहराची नगर पंचायत जनतेने आ. रोहित पवार यांच्या हाती दिली असताना सध्या सुरू असलेले येथील कामकाज पाहता आ. पवार हे हतबल असल्याची चर्चा होत असून, स्वच्छ सुंदर हरित कर्जतने राज्यात पहिला क्रमांक मिळविला असताना पुन्हा शहर पूर्वीच्या मार्गावर जाते की काय असे वाटू लागले आहे.

याकडे पूर्वी सारखे आ. पवार अथवा त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांचे लक्ष का राहिले नाही असा प्रश्न दबक्या आवाजात लोक विचारत आहेत. यावरून ही पवार विरूध्द पवार लढतीच्या चर्चेला खतपाणी घातले जात आहे.

आगामी काळात सत्तेच्या सारीपटावर सोंगट्या कसा फिरतात हे अनिश्चित असताना याच मतदार संघात असलेल्या अंबलिका साखर कारखान्याच्या दृष्टीने ही हा मतदार संघ आपल्या ताब्यात राहणे अजित पवार यांच्या साठी महत्वाचे ठरणार आहे.

पवार कुटुंबात खरोखर उभी फूट पडली असेल तर या चर्चा प्रत्यक्षात उतरू शकतात अशी अटकळ बांधली जात असून त्यादृष्टीने आगामी काळात येथील राजकारण अधिकच रंजक ठरणार आहे.

Ahmednagarlive24 Office