राजकारण

बाळासाहेब थोरातांची पुढची पिढी राजकारणात ! संगमनेर तालुका…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांची नुकतीच निवड करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कृणाल राऊत, महाराष्ट्राचे युवक काँग्रेस प्रभारी उदयभानू, जिल्हा प्रभारी रोहित कुमार आणि सहप्रभारी एहसान खान यांनी ही निवड जाहीर केली.

डॉ. थोरात या कॅन्सर तज्ज्ञ असून त्या मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर आधारित एकविरा फाउंडेशनची स्थापना केली.

महिलांसाठी आरोग्य शिबिरे, व्यावसायिक प्रशिक्षण, बचत गटांना मार्गदर्शन, सायकल वाटप, शालेय साहित्याचे वितरण, क्रीडा स्पर्धा, गुणदर्शन कार्यक्रम आदी माध्यमातून त्यांनी संगमनेर तालुक्यात महिला आणि मुलींसाठी अल्पावधीत मोठे काम उभे केले आहे.

युवा संवाद या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील प्रमुख युवक कार्यकर्त्यांच्या दीडशेहून अधिक बैठका घेऊन त्यांनी संवाद साधला. युवासंवादच्या माध्यमातून समोर आलेल्या बहुतांश प्रश्नांची त्यांनी सोडवणूक केली.

यावेळी युवकांनी डॉ. जयश्री यांना युवक काँग्रेस अध्यक्षपद स्विकारण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर डॉ. जयश्री या युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या होत्या.

युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष संघटनेत काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. शेवटच्या माणसापर्यंत काँग्रेसचा विचार पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहील. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात युवकांचे संघटन मजबूत करण्यावर माझा भर राहील.

माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी काँग्रेस पक्ष आणि नेतृत्वाचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया डॉ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केली.

Ahmednagarlive24 Office