Ahmednagar Politics : मागील ५० वर्षांपासून विखे पाटील कुटुंब राजकारणाबरोबरच समाजकार्यातदेखील पुढे आहे, प्रामाणिक कार्यकर्त्याला नेहमी प्रामाणिकपणे ताकद देण्याचे काम विखे कुटुंबाने केले आहे. विखे पाटलांच्या यंत्रणेचा अंदाज आतापर्यंत भल्याभल्यांना आलेला नाही, त्यामुळे विखे कुटुंबाचा अवाका सर्वश्रुत आहे.
जे काम होण्यासारखे आहे, त्याला हो म्हणायचं आणि प्रामाणिकपणे विकास कामांना जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम मागील साडेचार वर्षात केले असून, राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून खऱ्या अर्थाने विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम झाले असल्याचे प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा, जवखेडे दुमाला, कोपरे, हनुमान टाकळी, या ठिकाणी खा. विखे पाटील व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचे उद्घाटन व नागरिकांना साखर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. विखे पुढे म्हणाले की,
साखर वाटप कार्यक्रम हा सरकारी यंत्रणेचा नसून तो विखे कुटुंबाचा आहे. अयोध्या येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने हा दिवस सर्वांनी दिवाळी म्हणून साजरा करावा. प्रत्येकाने घरी गोड जेवण करावे, यासाठी साखर आणि डाळीचे वाटप केले जात आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार राजळे यांच्या माध्यमातून पाथर्डीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी रस्त्याच्या कामासाठी दिलेला आहे. इतरही विकास कामांसाठी आणखी निधी दिला जाणार असून, विकास कामात कुठे कमी पडणार नाही. राज्यात व देशात भ्रष्टाचारमुक्त सरकार असल्यामुळे विकास कामे करण्यासाठी भरीव निधी प्राप्त होत आहे.
आ. राजळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जवखेडे येथील सबस्टेशनच्या कामाला लवकर सुरुवात व्हावी, हनुमान मंदिरासमोर सभा मंडप देण्यात यावा, या भागातील बंधारे दुरुस्ती करण्याची मागणी या वेळी सरपंच वाघ यांनी केली.
याप्रसंगी माजी सभापती उद्धवराव वाघ, काशिनाथ पाटील लवांडे, विष्णुपंत अकोलकर, मा. जि.प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, मा. पं.स. सदस्य एकनाथ आटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुभाष बर्डे, संचालक अजय रक्ताटे, वैभव खलाटे, जिजाबापू लोंढे, जगदंबा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक खेडकर,
पोपटराव आंधळे, शिवाजी वेताळ, महादेव कुटे, साहेबराव गवळी, राजेंद्र तागड, उपसरपंच वर्षा गवळी, ग्रा.पं. सदस्य सुनीता वाघ, वैभव आंधळे, नितीन जाधव, अमोल मतकर, बाबासाहेब सरगड, शिवाजी मतकर, बाळासाहेब कासार, उत्तम कासार,
लक्ष्मण कासार, संभाजी कासार, दगडू आंधळे, बाबासाहेब मतकर, नामदेव वाघ, राजेंद्र मतकर, सादिक शेख, संभाजी वाघ, शमशुद्दीन शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. आभार अॅड. वैभव आंधळे यांनी मानले.
अयोध्येला मोफत घेऊन जाणार
दि. २२ जानेवारीला आयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून, त्या दिवशी घर परिसरामध्ये आकर्षक सजावट करणाऱ्या कुटुंबाची माहिती घेऊन त्यांना अयोध्येला मोफत देवदर्शन घडवून आणण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे खा. विखे पाटील यांनी या वेळी सांगितले.