राजकारण

Ahmednagar Politics : यांचा पॅटर्नचं वेगळा ! विखेंना तिकीट देताच लंके नाराज, आ.निलेश लंके आज सायंकाळी मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : भाजपने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभेचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.

आता विखे यांना तिकीट दिल्याने आ. निलेश लंके नाराज असल्याचे दिसत असून आज गुरुवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अहमदनगर मतदारसंघात विखे-लंके यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.

२०१९ च्या लोकसभा निवणुकीपूर्वी डॉ. विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळविली होती. त्यांनी या मतदारसंघातून विजयही मिळविला. त्यामुळे यावेळीही तेच उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते. मात्र, भाजपमधून प्रा. राम शिंदे, प्रा. भानुदास बेरड यांनीही उमेदवारीची मागणी केली होती.

भाजपने विखे यांचीच उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, पारनेरचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार लंके हे महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. लंके गुरुवारी पुण्यात पुन्हा घरवापसी करत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्ष प्रवेशाचे निरोपही कार्यकर्त्यांना आले आहेत.

याबाबत लंके यांनी अधिकृतपणे काहीही घोषणा केलेली नाही. प्रवेशानंतरच ते भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. लंके हे विखेंचे प्रबळ विरोधक मानले जातात. त्यामुळे महाविकास आघाडीकडून तेच उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित मानले जाते.

विकासाचा मुद्दा घेऊन आपण राजकारण करत आहोत. केंद्रीय समितीने आपणाला पुन्हा उमेदवारी दिली आहे. मोदी यांच्या चारशे पारच्या टप्प्यात आपला सहभाग असेल, महायुतीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन विजय पुन्हा खेचून आणू असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान आता जर निलेश लंके विरोधात खा. सुजय विखे अशी लढत झाली तर आ. राम शिंदेंसह विखे विरोधक कुणाचे काम करणांर याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office