राजकारण

नगरच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ, अहमदनगर काँग्रेसमध्ये पुन्हा पडणार मोठी फूट ? ‘हे’ बडे नेते अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या गळाला

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

यामुळे संपूर्ण देशात रोजाना विविध राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. खरेतर, आपल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यात की लगेचच विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत.

यामुळे राज्यात सर्वाधिक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून उमेदवारांच्या नावांवर मंथन सुरू आहे.

अशातच आता अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. अहमदनगर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार, काँग्रेसमध्ये पुन्हा मोठी फूट पडणार असे चित्र आहे. खरे तर विखे पाटील भाजपमध्ये येण्याअगोदर अहमदनगर काँग्रेसमधील ताकतवर नेते होते.

पक्षाची जिल्ह्यातील धुरा त्यांच्याकडे होती, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. मात्र विखे पाटील यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आणि भारतीय जनता पार्टीत ते सामील झालेत. यामुळे नगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व सूत्रे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आलीत. बाळासाहेब थोरात हे अहमदनगर काँग्रेसचे किंग मेकर आहेत.

मात्र आता बाळासाहेब थोरात यांच्यापुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वीच एक मोठे संकट उभे राहिले आहे. ती म्हणजे निवडणुकांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची ताकद काहीशी कमी होण्याचे चिन्ह आहे. काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष आता काँग्रेसला अलविदा करून अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

खरेतर, अहमदनगर जिल्ह्यात राजेंद्र नागवडे यांच्याकडे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. तसेच त्यांची पत्नी अनुराधा नागवडे यांच्याकडे काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष पद सोपवण्यात आले आहेत. पण, आता नागवडे कुटुंब थोडासा वेगळा विचार करत आहे. याची झलक नुकतीच समोर आली आहे.

काँग्रेस पक्षाला अलविदा ठोकून आता हे दाम्पत्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार अशा चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. खरेतर राजेंद्र नागवडे यांनी काँग्रेसचे माजी दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त काँग्रेसच्या एकाही नेत्याला निमंत्रित केले नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी आमंत्रण पाठवले होते.

यावरून लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र नागवडे यांनी आपली वाटचाल निश्चित केल्याचे समजत आहे. त्यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचे काही तज्ञ सांगत आहेत.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री महोदय यांनी देखील राजेंद्र नागवडे यांना आपण श्रीगोंद्यात राजकीय ताकद देऊ असे म्हटले आहे. तसेच उपमुख्यमंत्री पवार यांना निमंत्रित केलेल्या व्यासपीठावर आता कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करायचीच, अशी घोषणाही राजेंद्र नागवडे यांनी करुन टाकली.

ते किंवा त्यांच्या पत्नी म्हणजे अनुराधा नागवडे निवडणूक लढवतील असे यावरून स्पष्ट होऊ लागले आहे. यामुळे अहमदनगर काँग्रेससाठी नागवडे दांपत्यांनी घेतलेली ही भूमिका डोकेदुखी ठरणार असल्याचे जाणकार लोक स्पष्ट करत आहेत.

अशा परिस्थितीत, आता अहमदनगर काँग्रेसमधील ताकद कशी कायम ठेवायची हा मोठा सवाल बाळासाहेब थोरात यांच्यापुढे राहणार आहे.

Ahmednagarlive24 Office