राजकारण

महाराष्ट्रात सत्ताबदल होणार ! अहमदनगर मधील प्रसिद्ध भविष्यवाणी

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics : राज्यात सत्ता बदल होईल, गहू- हरभरा जोडीने येईल म्हणत पुन्हा एकदा पावसाचे आगमन होईल, असे संकेत, पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील सीताराम बाळाजी भगत यांनी दिले आहेत.

मिरी येथील राजा वीरभद्र देवस्थानच्या यात्रोत्सवानिमित्त रविवारी सीताराम भगत यांची वर्षभराची भविष्यवाणी ऐकण्यासाठी हजारो भक्तगण आले होते.

या वेळी भगत यांनी पुढील वर्षाची भविष्यवाणी व्यक्त करताना सांगितले की, रक्ताचा सडा होईल, असा इशारा देत मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कुठेतरी युद्धाची ठिणगी पडेल तसेच धरणी हादरणार असल्याचे म्हणत भूकंप होणार असल्याचे संकेत भविष्यवाणीतून दिले आहेत.

एकंदरीत भगत यांची भविष्यवाणी कही खुशी, कही गम, अशा पद्धतीची आहे. भविष्यवाणी वर्तवण्याअगोदर भगत स्वतःवर तलवारीचे वार करून घेतात. दुपारी चार वाजता जंगी हंगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेचे चांगले नियोजन करण्यात आले होते.

मिरी येथील राजा वीरभद्र यात्रा उत्सवानिमित्त पुढील वर्षभराची भविष्यवाणी वर्तवणारे पुजारी सिताराम भगत यांनी राज्यात बदलाचे वारे वाहणार असल्याचे संकेत दिल्याने उपस्थित भाविक भक्तांसह सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मिरीच्या होईकात व्यक्त केली जाणारी भविष्यवाणी खरी ठरते, अशी येथे येणाऱ्या भाविक भक्तांची भावना असल्याने येथील होईक एकण्यासाठी हजारो लोक उपस्थित असतात.

Ahmednagarlive24 Office