Ahmednagar Politics : लोकसभेचे वातावरण आता चांगलेच गरम झाले आहे. आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने सुरूच आहेत. मागील निवडणुकीतही दहशतवाद संपवणार हा मुद्दा होताच. आताही याच मुद्द्यावरून रान पेटले आहे.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुंबई येथे पारनेरकरांच्या मेळाव्यात पारनेरमधील दहशत संपविणार अशी टीका केली. तर दहशत करणारे व दहशतीला खतपाणी घालणारेच माझ्यावर दहशतीचा व गुंडगिरीचा आरोप करत आहेत, त्यांची दहशत मी संपवणार असल्याने ते घाबरले आहेत अशी टीका माजी आमदार नीलेश लंके यांनी केली.
खा. विखे म्हणतात …
दोन दिवसांपूर्वी विखे पाटील यांनी पारनेर येथील माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या सहकार्याने मुंबई येथे पारनेरकरांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात औटी व विखे यांनी लंके यांच्यावर टीका केली. पारनेरमधील दहशत मी संपवणार आहे, असे विखे त्या मेळाव्यात बोलताना म्हणाले.
दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी लंके यांच्या समर्थकांनी दिली असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये दहशतीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
लंके यांचा बुऱ्हानगरमध्ये एल्गार
सोमवारी रात्री नीलेश लंके यांनी बुऱ्हाणनगर व परिसरातील गावांमध्ये प्रचार दौरा केला. पहाटे तीन वाजेपर्यंत त्यांनी दौरा केला. यावेळी घेतलेल्या सभेमध्ये त्यांनी विखे व कर्डिले यांच्यावर टीका केली. ज्यांनी आजवर दहशतीचे राजकारण केले तेच लोक माझ्यावर आरोप करत आहेत.
यांच्या दहशतीमुळेच लोकांनी यांना नाकारले. जिल्हा वेठीस कोणी धरला आहे हे सर्वांना माहीत आहे. यांची दहशत मी संपविणार आहे म्हणून हे सर्व घाबरले आहेत. यावेळी त्यांनी दूधवाल्यांचे हे स्वतःला नेते म्हणवतात. दुधाच्या भावासाठी यांनी किती वेळा आवाज उठवला, असा प्रश्नही लंके यांनी कर्डिले यांना करत टीका केली.