‘वेळ बदलली, त्यामुळे चेहराही बदलला..’, मंत्री छगन भुजबळ मोठ्या निर्णयाच्या तयारीत, ठाकरेंसोबत येणार, की नवा पक्ष काढणार? मोठ्या हालचाली..

Ahmednagarlive24 office
Published:
politics

 

महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले व त्यानंतर लोकसभेची निवडणूक ही पहिली निवडणूक ठरली. परंतु या काळात दिग्गज नेते एकनाथ खडसे, सूरज जैन आदींनी यापुढे कोणतीही निवडणूक न लढवण्याबाबत भाष्य केले.

आता महाराष्ट्रातील आणखी एक दिग्गज नेते मंत्री छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र हा निर्णय कोणता असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. भुजबळ यांच्या समर्थकांनी एक रिल्स व्हायरल केले असून या रिल्सला वेळ बदलली, चेहरा बदललाय’ असे शीर्षक दिले आहे.

हे रिल्स व्हायरल होत असून यामध्ये भुजबळ हेच एकमेव संघर्ष योद्धा असल्याचे नमूद केलेय. परंतु यामध्ये केवळ त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीतील केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच छायाचित्र आहे. शरद पवार किंवा अजित पवार यांचा फोटोच यामध्ये नसल्याने मोठी चर्चा सुरु झाली आहे.

भुजबळ हे फायरब्रँड नेते
छगन भुजबळ हे फायरब्रँड नेते असून सुरवातीला शिवसेना – काँग्रेस- राष्ट्रवादी असा त्यांचा प्रवास आहे. या कारकिर्दीत त्यांना शरद पवार यांच्याकडून मात्र मोठे सहकार्य लाभले असल्याचे बोलले जाते. दरम्यान मध्यंतरी ते अजित पवार यांच्या गटात जात महायुतीमध्ये आले.

परंतु त्यांना नाशिकमधून लोकसभेला उमेदवारी देतो म्हणाले आणि ऐनवेळेस दिली नाही त्यामुळे ते नाराज झाले अशी चर्चा होती. त्यामुळेच भुजबळ समर्थकांनी तयार केलेल्या रिल्समध्ये केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेतचा फोटो असून, बाकी कुणीच त्यात नाही. विकासकामे आणि वंचितांसाठीचा संघर्ष हा यात मांडला आहे.

पुढील वाटचाल काय?
रिल्समध्ये पवार किंवा इतर नेत्यांचे फोटो नसल्याने पुढील राजकीय वाटचालीचे काही वेगळे संकेत आहेत का? ते आता पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जाणार का? की नवा राजकीय पक्ष काढणार अशी मोठी चर्चा सध्या रंगली आहे.