Ahmednagar Politics : उत्तरेत विखे विरुद्ध थोरात असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळाला आहे. असे असले तरी विखे यांनी त्यांचा शिर्डी व थोरातांनी त्यांचा संगमनेर हा बालेकिल्ला मजबूत ठेवला. परंतु सध्या अलीकडील काळात विखे याना शह देण्यासाठी थोरात व कोल्हे एकत्र येताना दिसत आहेत.
हे सत्ता समीकरण गणेशच्या कारखान्याच्या निवडणुकीत दिसले. यात विखे यांना चांगलाच शह मिळाला. त्यांची सत्ता तेथून संपुष्ठात आली. आता पुन्हा एकदा कोल्हे थोरात एकत्र आले आहेत.
निमित्त आहे कोट्यवधींची उलाढाल असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुका. आता हे दोघे मागील 20 वर्षांपासून विखे पाटील गटाची सत्ता असलेल्या सोसायटीत परीवर्तन करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचा बिगुल
1600 हून अधिक सभासद व 200 कर्मचारी संख्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचा आहे. 11 फेब्रुवारी रोजी याच्या निवडणुका होणार आहेत. 150 कोटी रूपये उलाढाल व वार्षिक नफा 4 कोटी रुपयांपर्यंत असून 75 कोटी रूपयांच्या ठेवी असणारी ही राज्यातील ही एकमेव कर्मचारी सोसायटी आहे.
विखे विरोधी विठ्ठल पवार यांच्या पॅनलचा मागील निवडणुकीत 11 – 3 असा पराभव झाला होता. परंतु यंदा त्यांच्या परिवर्तन विकास मंडळाला काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणी भाजपचे विवेक कोल्हे यांचे पाठबळ मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
विखे – थोरात लढत
सध्या सत्तेवर असलेल्या संचालक मंडळाला विखे पाटील गटातूनच विरोध होताना दिसत असल्याने विखे पाटील यांचेच दोन गट पडतील अशी शक्यता असून त्यांना थोरात कोल्हे एकत्रित विरोध करतील असे चित्र आहे.
साईमंदिरातील सोसायटीच्या निवडणुकीचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा निवडणुकीवर प्रभाव टाकणारा ठरणार असल्याने विखे पाटील विरुद्ध थोरात-कोल्हे अशी लढत पुन्हा पाहायला मिळणार आहे.
त्यामुळे आता २० वर्षांची सत्ता विखे पाटील राखणार का? की थोरात कोल्हे एकत्र येत परिवर्तन करणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.