मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची नेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव यांच्यावर जोरदार पलटवार केला. शिवसेना वाचवायची असेल तर तुम्ही राष्ट्रवादीचा नाद सोडा, असे रामदास कदम यांनी म्हणाले. तसंच शिवसेनेतील ४० आमदार वेगळा विचार करत असतील तर उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवे, असेही रामदास कदम म्हणाले. या पार्श्वभूमीवर आता गुहागर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना आक्रमक इशारा दिला आहे.
‘मला रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर एकदा बोलायचे आहे. मी आज सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. कोण-कोण या बाबतीत मत मांडत आहे, ते मी पाहतोय. पण रामदास कदमांना मला एकदा रोखठोक उत्तर द्यावं लागेल आणि ते मी योग्यवेळी देईन,’ असे भास्कर जाधव म्हणाले आहेत.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढे करून भाजप आपला छुपा अजेंडा राबवत आहे. हे सरकार भारतीय जनता पक्षाचेच आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मागील सरकारने घेतलेल्या जनहिताच्या अनेक कामांना स्थगिती देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. ज्या मंडळींनी भाजपबरोबर जाऊन सरकार बनवले त्यामध्ये आधीच्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील ९ मंत्री आहेत. मग त्यांनीच घेतलेले निर्णय चुकीचे होते का? १ एप्रिलला कामांचा निर्णय झाला, त्यामध्ये तुम्ही होतात मग तुम्ही आता गप्प का?’ असा सवाल भास्कर जाधवांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केला आहे.