श्रीगोंद्यात उद्धव सेना, शरद पवार राष्ट्रवादीला धक्का ! घारगावात बैठक : शिर्के, शेंडे राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर…

Mahesh Waghmare
Published:

२७ जानेवारी २०२५श्रीगोंदा : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंद्यातील नेते अलर्ट झाले आहेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवसेना, भाजपला खिंडार पाडण्यासाठी व्यूहरचना आखली आहे.तीनही पक्षातील मोठे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

शनिवारी (दि. २५) सायंकाळी घारगाव (ता. श्रीगोंदा) येथे दत्तात्रय पानसरे यांच्या दत्तकृपा कॉलेज येथे बैठक झाली. यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, उद्धवसेनेचे तालुका प्रमुख विजय शेंडे, अख्तार शेख, बाळासाहेब मनसुके, प्रवीण कुरुमकर, विजय नलगे, अॅड. निवृत्ती वाखारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत येत्या आठ दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भगवानराव पाचपुते होते.राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा, मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे म्हणाले की, अजित पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत. त्यामुळे संघटनेत काम करताना सर्वांना न्याय मिळेल. यापुढे साखर कारखानदारांना सोडून तालुक्यात फिल्डिंग लावणार आहे.

आगामी काळात राष्ट्रवादीला विश्वासात घेतल्याशिवाय कुणाला पाऊल टाकता येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती संजय जामदार, माजी उपनगराध्यक्ष अख्तार शेख, विजय नलगे, बापू सिदनकर, फुलसिंग मांडे, दत्तात्रय रासकर, बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब इथापे आदी उपस्थित होते.

कोण काय म्हणाले ?

हरिदास शिर्के, विजय शेंडे, प्रवीण कुरुमकर म्हणाले, बाळासाहेब नाहाटा हे आमचे नेते असून विधानसभा निवडणुकीपूर्वीच आमची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा होती. बाळासाहेब मनसुके, संभाजी घुटे म्हणाले, दत्तात्रय पानसरे हे ताकद देणारे नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत जाणार आहे.

पानसरे हेच चेहरा..

श्रीगोंदा तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा चेहरा दत्तात्रय पानसरे हेच राहणार आहेत.त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे नाहाटा यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe