Maharashtra News : सध्या देशामध्ये अघोषित हुकूमशाही सुरू आहे. तिला हातामध्ये मशाल घेऊन जाळून टाकण्याची वेळ आली आहे. अन्नदात्याला देशोधडीला लावण्याचे काम केले जात आहे. हे सर्व काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
महाविकास आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर आयोजित सभेमध्ये ठाकरे बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात,
आ. शंकरराव गडाख, आ. लहु कानडे, आ. नितीन देशमुख, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, हेमंत ओगले, ज्ञानेश्वर मुरकुटे, वंदनाताई मुरकुटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, अशोक कानडे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, महायुतीच्या काळात कोणत्याही शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. निर्यातबंदी आणून कांद्याचे भाव पाडले गेले. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे ११ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. कोरोना काळात देशाचे अर्थचक्र शेतकऱ्यांमुळेच फिरले. आज याच शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
ही बिकट अवस्था मोदी सरकारने केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर शेती करण्यासाठी ज्या वस्तु वापरल्या जातात, त्यावरील जीएसटी रद्द करुन शेतमालाला हमीभाव देणार आहे. त्यामुळे महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा संधी द्या, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
आ. थोरात म्हणाले की, महाआघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. २४ तास सामान्य माणसासाठी राबणारे, त्यांचे प्रश्न आपुलकीने सोडविणारे भाऊसाहेब वाकचौरे एक सामान्य व्यक्तिमत्व आहे. त्यांना साथ द्या. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.