Grampanchayat Election : गावागावांत रंगले गावकी, भावकीचे राजकारण… पुढाऱ्यांनी कसली कंबर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Grampanchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे विधानसभेची पूर्व तयारी असून, यामध्ये सर्वच पक्षांच्या प्रमुख राजकीय नेत्यांची भूमिका महत्वाची ठरणार असून, ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

तसेच स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक हाच मार्ग आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, सभा व बैठकांचे नियोजन केले जात आहे.

शेवगाव तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी दि. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. याकरिता सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावा, याकरिता सर्वच पक्ष पूर्ण ताकतीने कामाला लागले आहेत.

बुधवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेऊन ३ नंतर उमेदवारांना चिन्ह मिळताच निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. बहुतांशी गावागावांत गावकी, भावकीचे राजकारण रंगले असून, गाव पुढाऱ्यांनीदेखील यामध्ये चांगलीच कंबर कसली आहे.

ग्रामपंचायतीची निवडणूक ही कुठल्या राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढविली जात नाही. सर्वच राजकीय पक्ष पॅनल तयार करून अप्रत्यक्षपणे ही निवडणूक लढवतात. ग्रामपंचायतीमध्ये आपल्या पक्षाची सत्ता यावी, याकरिता नेत्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे.

त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते ग्रामपंचायतीवर लक्ष ठेवून आहेत. परिणामी गावपातळीवरही नेत्यांच्या बैठका वाढल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय खेळी सुरू झाली आहे. कार्यकर्ते जोडण्याकरिता अनेक प्रलोभने दाखविली जात आहेत.

आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता नेते आपली पूर्ण ताकद लावताना दिसत आहेत, त्यामुळे गुलाबी थंडीत ग्रामीण भागातील वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांकडून साम, दाम, दंड, भेद, अशा सर्वच गोष्टीचा वापर केला जात आहे.

अनेक आरक्षित वाडांमध्ये उमेदवार मिळाले नसल्याने एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना परस्परविरोधी गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. काही ठिकाणी भाऊ, भाऊ, काही ठिकाणी जावा, जावा तर काही ठिकाणी चुलते, पुतणे एकमेकांविरोधात निवडणूक लढण्याकरिता उभे टाकले आहेत.

काही ठिकाणी एकाच पक्षाचे दोन गट एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून लढत असल्याचेही पाहायला मिळत आहे. परिणामी अनेक ठिकाणी वातावरणात ताणतणाव निर्माण होत आहे. सार्वत्रिक निवडणुका रविवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.

उमेदवारांना प्रचाराकरिता चिन्हांचे वाटप झालेले आहे. सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून, समाजमाध्यमांद्वारे उमेदवारांनी मतदारांना प्रभावित करण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक, या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याकरिता गटाचे प्रमुख आणि उमेदवार यांच्याकडून वेगवेगळ्या पोस्ट वारंवार टाकल्या जात आहेत. व्हॉट्सअॅपच्या विविध ग्रुपमध्ये उमेदवार आपले फलक झळकवताना दिसून येत आहे. उमेदवारांसाठी सहज आणि सोपे माध्यम ठरत असल्याने त्याचा पुरेपूर वापर उमेदवारांकडून होत आहे.

मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्याकरिता विविध प्रलोभने दाखविली जात आहेत. आपल्या गटाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सर्वच उमेदवार निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त झाल्याचे चित्र सध्या अनेक गावांमध्ये दिसून येत आहे